

पुणे: उन्हाळ्यात शाळांना पडलेल्या सुट्यांमुळे बहुतांश नागरिक आपल्या मूळगावी जाण्यासाठी निघतात. त्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी होते. हे लक्षात घेत, पुणे रेल्वेस्थानकावर गर्दी नियंत्रणासाठी लवकरच ‘होल्डिंग एरिया’ (स्वतंत्र कक्ष) स्थापन केला जाणार आहे.
याशिवाय रेल्वेकडून उन्हाळी विशेष जादा गाड्या आणि पुणे रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, सुविधेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे, असे रेल्वे पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) राजेश कुमार वर्मा यांनी सांगितले.
पुणे रेल्वेस्थानकातील मुख्यालयात शुक्रवारी (दि.3) पार पडलेल्या पत्रकार परिषदेनंतर दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना डीआरएम राजेश कुमार वर्मा यांनी ही माहिती दिली. यावेळी विभागीय वाणिज्य व्यवस्थापक हेमंत कुमार बेहरा उपस्थित होते. ते म्हणाले, सणासुदीच्या पार्श्वभूमीवरसुद्धा बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते, त्यावेळी देखील गर्दी नियंत्रणासाठी व प्रवाशांच्या सोयीसाठी ‘होल्डिंग एरिया’ तयार केला जातो, असाच होल्डिंग एरिया उन्हाळ्यात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वेस्थानकावर उभारण्याचे नियोजन आमच्याकडून करण्यात येत आहे.
हेमंत कुमार बेहेरा म्हणाले, होल्डिंग एरियासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपात आणि परिसरात मोबाईल चार्जिंग सुविधा, मोबाईल टॉयलेट (स्वच्छतागृह), पंखा, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी व्यवस्था, ऊन, वारा, पाऊस बचावासाठी संरक्षण आच्छादन, ट्रेनची अपडेट माहिती देणारा इलेक्ट्रॉनिक फलक आणि रेल्वे सुरक्षा जवानांचा 24 तास कडक पहारा असणार आहे.
याशिवाय स्थानकावर अतिरिक्त तिकीट बुकिंग काऊंटरची व्यवस्था, अतिरिक्त मनुष्यबळ तैनात, कमर्शिअल स्टाफ, आरपीएफ निरीक्षक/ जवान, टीसी, अतिरिक्त एटीव्हीएम/अतिरिक्त तिकीट काऊंटर, नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. त्याव्यतिरिक्त पुणे रेल्वेस्थानकावर स्वतंत्र कंट्रोल रूमसह मदत कक्ष देखील उभारण्यात येणार आहे.