

पुणे : पुणे रेल्वे स्थानकासह उरुळी, शिवाजीनगर, खडकी आणि हडपसर या चार स्थानकांचा व्यापक विकास करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली. पुणे शहर हे देशातील महत्त्वाचे टेक्नॉलॉजिकल आणि शैक्षणिक हब बनले असून, संपूर्ण देशातून येथे येणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी सातत्याने होत आहे.
पुणे स्थानकावरील वाढती गर्दी लक्षात घेऊन उरुळी येथे मोठे टर्मिनल उभारण्याचे नियोजन सुरू आहे. यामुळे पुण्यात उतरलेल्या गाड्या उरुळी येथे जाऊन देखभाल-दुरुस्ती करता येईल, त्यामुळे पुणे स्थानकावरील ताण कमी होईल. हाच विकास मॉडेल हडपसर, शिवाजीनगर आणि खडकी स्थानकांसाठीही राबवण्यात येणार आहे. या विकासामुळे पुण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची क्षमता वाढेल, रेल्वे ट्रॅफिक सुटसुटीत होईल, आणि नवीन गाड्या सुरू करणे सोपे होणार आहे. अशा प्रकारचा प्रकल्प याआधी बेंगळुरूमध्ये यशस्वीपणे राबवण्यात आला आहे आणि त्याच धर्तीवर पुण्यातही काम करण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. या विकासामुळे पुणे शहरातील रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होणार आहे!