

पुणे : आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग जनजागृती दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने गुरूवारी (दि.५) एक विशेष मोहिम राबविण्यात आली. नागरिकांमध्ये रेल्वे फाटक ओलांडताना घ्यावयाच्या सुरक्षिततेच्या उपायांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. ही मोहीम पुणे-दौंड आणि पुणे-सातारा मार्गावरील एकूण १३ रेल्वे फाटकांवर घेण्यात आली.
या मोहिमेदरम्यान, संरक्षा निरीक्षक आणि पर्यवेक्षकांनी पुणे-दौंड मार्गावरील फाटक क्रमांक २, ४, ७, ८ आणि पुणे-सातारा मार्गावरील फाटक क्रमांक ५८६, ४, १०, १९, २६, २७, ३१, ३२ आणि ३३ येथे वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. त्यांना रेल्वे फाटक सुरक्षितपणे कसे ओलांडावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पुण्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा आणि अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक पद्मसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली. वरिष्ठ विभागीय संरक्षा अधिकारी राजेंद्र कुमार कठल, सहाय्यक विभागीय संरक्षा अधिकारी दिलीप तायडे यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. अजयकुमार सिन्हा, रत्नाकर पाटील, विनय कुमार, श्रीवास्तव, तसेच कार्यालयीन कर्मचारी प्रवीण दरगुडे, रोहित पंडित आणि ईश्वर कोनारी यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
५५०० संरक्षा पत्रके वाटण्यात आली
५७५० व्हॉट्सअॅप संदेश पाठवले गेले.
१३ पथनाट्ये (नुक्कड नाट्ये) सादर करून लोकांना माहिती देण्यात आली.
५६५० रस्त्यावरील वापरकर्त्यांना थेट मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय, रेल्वे स्थानकांवरील उद्घोषणा प्रणालीद्वारेही सुरक्षिततेचे संदेश प्रसारित करण्यात आले.