

पुणे: मिळकतकर भरण्यासाठी महापालिकेला दिलेले काही धनादेश वटले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, याप्रकरणी महानगरपालिकेच्या मिळकतकर विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.
हे धनादेश न वटल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा करआकारणी व संकलन विभागाने दिला आहे. अभय योजनेनंतर मोठ्या प्रमाणावर धनादेश स्वीकारण्यात आले होते. मात्र, त्यापैकी तब्बल 7 हजार 47 धनादेश अद्याप वटले नसल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत 638 जणांवर 138 अंतर्गत गुन्हे दखल करण्यात आल्याची माहिती मिळकतकर विभागप्रमुख रवी पवार यांनी दिली.
महापालिकेकडून दरवर्षी मिळकतकराची देयके वितरित केली जातात आणि ती निर्धारित मुदतीत भरण्याची जबाबदारी मिळकत धारकांची असते. अनेक नागरिक धनादेशाद्वारे कर भरतात; परंतु अपुरी बँक माहिती, तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे काही धनादेश वटत नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे.
1 एप्रिल 2024 पासून अशा अनेक घटना घडल्या असून, संबंधितांना ‘नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट 1881’च्या कलम 138 अंतर्गत नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. तरीही अनेकांनी कराची थकबाकी भरलेली नाही, त्यामुळे महापालिकेला आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ज्या नागरिकांचे धनादेश वटलेले नाहीत, त्यांनी तातडीने थकबाकी भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा, नियमानुसार संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा उप आयुक्त तथा करआकारणी व संकलन विभागप्रमुख रवी पवार यांनी दिला आहे.