राहुल गांधींच्या भ्रामक विचारांमुळे अराजकतावाद्यांना बळ; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

'ठाकरेंना माझ्याकडून होती उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर'
Political News
राहुल गांधींच्या भ्रामक विचारांमुळे अराजकतावाद्यांना बळ; देवेंद्र फडणवीसांचा आरोपPudhari
Published on
Updated on

पुणे: देशातील संवैधानिक यंत्रणेबाबत अपप्रचार करून त्यांच्याबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा 180 अराजकतावादी संघटनांचा कट आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भ्रामक विचारांमुळे देशात अराजक निर्माण करण्याचा कट करणार्‍या शक्तींना बळ मिळत आहे, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

‘जयपूर डायलॉग’च्या डेक्कन समिट कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि जयपूर डायलॉगचे प्रमुख संजय दीक्षित यांनी फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर कठोर शब्दांत हल्ला चढविला.

राहुल गांधी यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीपेक्षा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत 40 लाख मतदार वाढल्याचा दाखला देऊन हे भारतीय जनता पक्षाचे ‘व्होट इंजिनिअरिंग’ असल्याचा आरोप केला होता. या आरोपाचा फडणवीस यांनी समाचार घेतला.

फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांनी आपल्या पराभवाच्या कारणांचा शोध घेतला, तरच त्यांचा पक्ष टिकून राहू शकेल. मात्र, ते केवळ बहाणेच शोधत राहिले, तर आगामी काळात काँग्रेसची अवस्था आणखी बिकट झाल्याशिवाय राहणार नाही. राहुल गांधी हे सतत भ्रामक राहणारे नेते आहेत. जनतेने त्यांची साथ सोडली आहे, याची जाणीवही त्यांना होत नाही.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासारख्यांना बरोबर घेऊन त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या, तर त्यांचे विचारही तसेच राहणार. विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांमध्ये तब्बल एक कोटी मतांचा फरक असल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

लोकसभा निवडणुकीत भाजपची लढाई या अराजकतावादी संघटनांशी होती. त्यांनीच भाजपबद्दल अनेक ’फेक नरेटिव्ह’ मतदारांमध्ये पसरवली. त्याला तोडीस तोड उत्तर देण्यात आम्ही कमी पडलो. विधानसभा निवडणुकीत मात्र अशा अपप्रचाराला सडेतोड उत्तर देण्याची यंत्रणा संघपरिवारातच असल्याचे लक्षात घेऊन आम्ही संघपरिवारातील विविध संस्था संघटनांच्या सहकार्याने उत्तम कामगिरी करू शकलो, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ठाकरेंना माझ्याकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर

भाजप आणि शिवसेना युती अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरून संपुष्टात आल्याचा संपूर्ण वृत्तांत देखील फडणवीस यांनी सविस्तर कथन करताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मागितले होते. पण, अमित शहा यांनी त्यांना मुख्यमंत्रिपद देण्यास स्पष्ट नकार दिला होता. याउलट मीच त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती.

मी, आदित्य आणि रश्मीवहिनी बाहेर बसलो होतो, त्या वेळी उद्धव ठाकरे हे अमित शहा यांना भेटण्यासाठी आत गेले. बाहेर येऊन पत्रकार परिषदेमध्ये कोणी आणि काय बोलायचे ते ठरले. ज्याप्रमाणे ठरले होते तसे मी बोललो. पण, आम्ही सरकार बनवू शकतो, हे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रंग बदलला, असा आरोप फडणवीसांनी केला.

शरद पवार आणि उध्दव ठाकरेंचे निवडणुकीपूर्वीच साटेलोटे

निवडणुकीचा निकाल लागल्यावर ठाकरे यांनी फोन करून काय करायचे आणि काय नाही, हे ठरवले असते. पण, पुन्हा त्यांनी माझा फोन घेतला नाही. निकाल लागताच त्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेणे टाळले आणि आधी एकट्यानेच पत्रकार परिषद घेत आम्हाला सगळे पर्याय खुले असल्याचे सांगितले.

जर त्या वेळी मुख्यमंत्रिपदाबाबत काही ठरले असेल, तर त्याची किमान चर्चा तरी त्यांनी केली असती. वास्तविक, तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि तत्कालीन शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात निवडणुकीपूर्वीच साटेलोटे झाले असल्याचा दावा त्यांनी केला.

शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्या करमणूक करणार्‍या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या सतत प्रसिद्ध होणार्‍या बातम्या केवळ करमणूक करणार्‍या आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. एकनाथ शिंदे हे धीरगंभीर व्यक्तिमत्त्वाचे नेते आहेत. त्यांची तशीच छायाचित्रे प्रसिद्ध करून त्यांच्या नाराजीच्या बातम्या पसरविल्या गेल्या, असे सांगतानाच फडणवीस यांनी प्रसार माध्यमांमध्ये सर्जनशीलता राहिलेली नाही. माहितीच्या मुळाशी जाण्याची, खात्री करून घेण्याची, शोध घेण्याची, नवनवीन विषयांना भेटण्याची वृत्ती आणि गांभीर्य माध्यमांमध्ये राहिले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

लोकसभेच्या जागेच्या बदल्यात सोडला मुख्यमंत्रिपदाचा आग्रह

मुख्यमंत्रिपदाबाबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर चार दिवसांनी मला उद्धव ठाकरेंकडून निरोप आला की, आपण पु्न्हा चर्चा करू इच्छितो. मी सांगितले की, अडीच वर्षांची मुख्यमंत्रिपदाची अट असेल तर आम्ही चर्चा करण्यासाठी येणार नाही. त्यावर मला त्यांचा निरोप आणणार्‍याने सांगितले की, त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा आग्रह सोडला आहे.

त्यांना लोकसभेला एक जागा वाढवून हवी आहे. एक जागा वाढवून दिली तर आम्ही अडीच वर्षांचा आग्रह सोडतो, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. त्यांनी पालघरची जागा मागितली. मी तीपण द्यायला तयार नव्हतो. पण, अमित शहा यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, एका जागेने काय फरक पडणार आहे? त्यामुळे आम्ही पालघरची जागा दिली.

छत्रपती शिवरायांबद्दल बोलताना जनभावनेचा विचार करावा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आर्ग्याहून सुटकेच्या ऐतिहासिक घडामोडीवर ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर बोलताना फडणवीस म्हणाले की, शिवरायांबद्दल बोलत असताना जनभावनेचा विचार करूनच सर्वांनी बोलले पाहिजे.

त्यामुळे लोकांची भावना दुखावेल अशा प्रकारच्या इतिहासाचे वर्णन किंवा इतिहासाचे विकृतीकरण हे कोणाच्याच हाताने होऊ नये. या प्रकरणाबाबत राहुल सोलापूरकर यांनी माफी देखील मागितलेली आहे. दरम्यान, या प्रकरणात जी काही योग्य कारवाई आहे ती करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news