

पुणे : गुलेन बॅरी सिंड्रोममुळे (जीबीएस) शहरात सोमवारी (दि.१७) आणखी एका मृत्यूची नोंद झाली असून जिल्ह्यातील 'जीबीएस'मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ९ वर गेली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालात ९ मृत्यूंपैकी ४ मृत्यू जीबीएस आणि ५ संशयास्पद मृत्यू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
वाघोली येथील ३४ वर्षीय पुरुषाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला. रुग्णाला आधी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी त्याला ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते. रुग्णाला ३ ते ८ फेब्रुवारी या काळात मानेचे स्नायू, श्वसनाचे स्नायू, चेहर्याचे स्नायू आणि गिळण्याचे स्नायू यांची शक्ती कमी झाली. त्याला ७ फेब्रुवारी रोजी श्वासोच्छवासाच्या स्नायूंचा अर्धांगवायू, मानेच्या स्नायूंचा अर्धांगवायू झाला. रुग्णावर उपचार सुरु असताना शनिवारी (दि.१५) सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.