पुणे : पुढारी वृत्तसेवा : ऐतिहासिक लाल महालामध्ये लवकरच पर्यटकांना मराठा सैन्याने वापरलेल्या शिवकालीन शस्त्रांच्या प्रतिकृती पाहायला मिळणार आहेत. लाल महालात शस्त्रास्त्रे प्रदर्शन दालन आणि लाल महालातील घटनांचे मॅपिंग करून साउंड शो सुरू करण्याचा निर्णय महापालिकेच्या हेरिटेज विभागाने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज बालपणी लाल महालात वास्तव्याला होते. याच लाल महालात महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटून त्याला पळवून लावले होते.
काळाच्या ओघात हा लाल महाल मोडकळीस आल्यानंतर महापालिकेने 30 वर्षांपूर्वी पुन्हा लाल महालाची प्रतिकृती उभारली. हा लाल महाल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. याठिकाणी अधिकाअधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महापालिका प्रशासनाने काही पावले उचलली आहेत. महाराजांनी वापरलेली वाघ नखे आणि तलवार कशी होती? ती त्यांना कशी मिळाली? आणि सध्या कुठे आहे? त्यांची नावे काय ? यांसारखे अनेक प्रश्न मराठी माणसाच्या मनात आजही कायम आहेत.
महाराजांनी जे अतुलनीय असे पराक्रम केले, त्यामध्ये प्रामुख्याने अफजल खानाचा वध, शाहिस्तेखानावर हल्ला हे दोन प्रसंग अतिशय घातक व जीवघेणे असेच होते. हा इतिहास पर्यटकांना कळावा, यासाठी लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वापरत असलेल्या शस्त्रास्त्रांचे महापालिकेकडून कायमस्वरूपी प्रदर्शन उभारण्यात येणार आहे. यामध्ये महाराज वापरत असलेली जगदंबा तलवार, भवानी तलवार, ढाल, खांडा, समशेर, गुर्ज, चिलखत, मराठा पट्टा, मराठा धोप, बिचवा, वाघनखे, मराठा कट्यार व अन्य तलवारींच्या धातूंच्या प्रतिकृतींचा समावेश असेल. मूळ भवानी तलवार सध्या लंडनच्या म्युझियममध्ये असून, जगदंब तलवार सिंधुदुर्ग किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आहे.
महाराजांच्या या शस्त्रांचा इतिहास अभ्यासकांनी बारकाईने केलेला अभ्यास व ऐतिहासिक वर्णनाच्या आधारे मूळ शस्त्रांच्या हुबेहूब प्रतिकृती करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे 12 लाख 70 हजार रुपयांच्या खर्चास गुरुवारी महापालिकेच्या एस्टिमेट कमिटीने मंजुरी दिल्याची माहिती हेरिटेज विभागाचे अभियंता सुनील मोहिते यांनी दिली.
हेही वाचा