Pune News : जुन्नरमध्ये पेट्रोल-डिझेल संपल्याची अफवा, पंपांवर प्रचंड गर्दी; प्रशासनाकडून नागरिकांना संयमाचे आवाहन

काही दिवसांपूर्वी गॅस सिलिंडर तुटवड्याबाबतही अशाच अफवा पसरल्या होत्या.
Pune News : जुन्नरमध्ये पेट्रोल-डिझेल संपल्याची अफवा, पंपांवर प्रचंड गर्दी; प्रशासनाकडून नागरिकांना संयमाचे आवाहन
Published on
Updated on

लेण्याद्री : पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा पसरताच जुन्नर शहरासह परिसरातील पेट्रोल पंपांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र रविवारी (दि. २२) दुपारपासून पाहायला मिळाले. अचानक वाढलेल्या या गर्दीमुळे अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

जुन्नर शहर व परिसरात एकूण पाच पेट्रोल पंप असून त्यापैकी केवळ एकाच पंपावर पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध असल्याची माहिती समोर आली. उर्वरित पंपांवर इंधन संपल्याने ग्राहकांनी उपलब्ध असलेल्या पंपावर धाव घेतली. परिणामी त्या पंपावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रांग लागून काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

दरम्यान, सलग तीन दिवसांच्या शासकीय सुट्ट्यांमुळे इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरच्या येण्यात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे अनेक पंप ‘ड्राय’ झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेकांनी गरजेपेक्षा जास्त पेट्रोल भरण्याचा प्रयत्न केला.

या पार्श्वभूमीवर काही पंप मालकांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक ग्राहकाला केवळ २०० रुपयांपर्यंतच पेट्रोल देण्याचा निर्णय घेतला. तरीही काही ग्राहकांनी अधिक इंधनाची मागणी केल्याने काही ठिकाणी पंप कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचेही दिसून आले.

भारत पेट्रोलियमचे पंप मालक हितेश शहा यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “इंधनाचा तुटवडा तात्पुरता असून उद्या सकाळपर्यंत टँकर येणार आहेत. त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पॅनिक होऊन गर्दी करू नये. गरजेपुरतेच पेट्रोल-डिझेल घ्यावे.”

काही दिवसांपूर्वी गॅस सिलिंडर तुटवड्याबाबतही अशाच अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर आजची परिस्थिती अधिकच तीव्र झाल्याचे दिसून आले.

प्रशासन व पंप मालकांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, उद्यापासून इंधन पुरवठा सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news