Pune News : रोहित पाटील यांचे दौंड न.प.चे नगरसेवकपद रद्द, जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Pune News : रोहित पाटील यांचे दौंड न.प.चे नगरसेवकपद रद्द, जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
Published on
Updated on

दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवारी (दि. ४) आदेश काढून पाटील यांचे नगरसेवकपद रद्द केल्याचे जाहीर केले. त्यामुळे दौंड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ४ 'अ'मधील मागास प्रवर्गासाठी राखीव असलेली जागा रिक्त झाली आहे.पाटील हे नागरीक हित संरक्षण मंडळ या आघाडीकडून निवडुण आले होते.

दौंड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक ४ 'अ'मधून मागास प्रवर्गासाठी राखीव जागेवरून पाटील निवडून आले होते. निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे यांनी अवैध ठरविले आहे. पाटील यांनी सादर केलेले कुणबी (इतर मागास वर्ग) या प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयानंतर संबंधित नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत दौंड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर केला होता.

संबंधित जागा रिक्त झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाला देणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आपल्या आदेशाद्वारे रोहित राजेश पाटील यांचे दौंड नगरपरिषदेतील नगरसेवकपद रद्द केले असून, प्रभाग क्रमांक ४ 'अ'मधील नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असलेली जागा रिक्त झाल्याचे घोषित केले आहे.

या निर्णयामुळे दौंडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आता या रिक्त जागेबाबत पुढील निवडणूक प्रक्रिया कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत रोहित पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या निर्णयाविरोधात मी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news