Pune News : ‘आनंदाचा शिधा’साठी रेशन दुकानांत चकरा

Pune News : ‘आनंदाचा शिधा’साठी रेशन दुकानांत चकरा
बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या वतीने धान्य दुकानांतून गरिबांसाठी अल्पदरात 'आनंदाचा शिधा' वाटप करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, बिबवेवाडी परिसरातील स्वस्त धान्य दुकानांत हा शिधा अद्यापही पोहोचला नाही. परिणामी, झोपडपट्टीमधील गरीब नागरिक रेशन दुकानदारांकडे हा शिधा मिळण्यासाठी चकरा मारताना दिसत आहेत. लाभार्थींची दुकानदारांशी बाचाबाचीही होते.
अशा वेळी दुकानदारांना दुकान बंद करून घरी जाण्याशिवाय पर्याय रहात नाही. त्यामुळे सरकारचे गरिबांना आनंदाचा शिधा देण्याचे धोरण फसवे निघाले की काय, अशी चर्चा नागरिकांत आहे. दिवाळीचा सण दोन दिवसांवर आला असताना धान्य व साहित्य मिळालेले नाही म्हणून नागरिकांमधून नाराजीचा सूर निघत आहे. दिवाळी दोन दिवसांवर आली असताना कष्टकरी नागरिकांनी कोणाकडे हात पसरायचा? दरमहिन्याला रेशन मिळतानादेखील असेच होते. आता सणांमध्येसुद्धा हीच परिस्थिती निर्माण झाली आहे, असे मत बिबवेवाडीतील विनायक भोसले यांनी व्यक्त केले.
आम्हाला रेशन दुकानातून आतापर्यंत कोणतेच साहित्य मिळालेले नाही. दररोज दुकानात जाऊन येतोय. दुकानदार म्हणतात अजून माल आलेला नाही .आम्ही गरिबांनी दिवाळी कशी करायची?
  शांताबाई कांबळे, लाभार्थी
सणाच्या कालावधीत किट व अन्नधान्य चार दिवस अगोदर येणे अपेक्षित होते. तसेच 'पॉस'मध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे धान्य वाटप करता येत नाही. प्रत्येक सणाच्या वेळी प्रशासनाकडून दिरंगाई होते. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला आम्हाला तोंड द्यावे लागते. किमान आता तरी लवकरात लवकर धान्य वितरित व्हावे, ही अपेक्षा आहे.
-गणेश डांगी, अध्यक्ष, पुणे शहर स्वस्त धान्य चालक-मालक संघटना
जसे आमच्याकडे धान्य व किट उपलब्ध होईल तसे शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे वितरित केले जाईल. थोडाफार उशीर झाला आहे, पण दहा नोव्हेंबरपर्यंत सर्व दुकानदारांना आनंदाचा शिधा किट व धान्य पोहोच केले जाणार आहे.
– दादासाहेब गीते, उपजिल्हाधिकारी त
था अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे शहर.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news