

नायगाव : पुरंदर उपसा योजनेच्या माध्यमातून नावारूपाला आलेल्या पोंढे (ता. पुरंदर) गावावर प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे दोन खडी मशीनचे मोठे संकट उभे राहिले आहे. राजकीय पॉवर मिळाल्यास गावातील संकट टळेल व पुढील पिढ्यांच्या भवितव्य चांगले होईल; अन्यथा येथील ग्रामस्थांना शेतीवाडी, गाव सोडून जाऊन आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही. दरम्यात आर्थिक ओझ्याखाली दाबल्याने नियमबाह्य पद्धतीने दिलेल्या परवानग्या रद्द करण्याची मागणी येथील ग्रामस्थानी केली आहे.
पुरंदर उपसा सिंचन योजना कार्यान्वित होण्यापूर्वी दौंड तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या यवत या ठिकाणी जाऊन मोलमजुरी करणे, वाट्याची शेती करणे, हमाली करणे यावरच पोंढे (ता. पुरंदर) येथील ग्रामस्थांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह होत होता. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पायदळी प्रवास हा येथील ग्रामस्थांच्या पाचवीला पुजलेला होता. अशा कठीण परिस्थितीत पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचा आधार येथील ग्रामस्थांना मिळाला. त्यामुळे दुष्काळी म्हणून ओळखले जाणारे गाव फुलशेती अन् ऊस शेती म्हणून ओळखले जावू लागले. यासोबतच कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसायात येथील युवकांनी केलेली प्रगती गावच्या प्रगतीला दिशा देणारी ठरली. शेतीमुळे ग्रामस्थांची व परिणामी गावची प्रगती होऊ लागली. युवकांना शेतीपूरक व्यवसायामुळे जगण्याच्या मोठा आधार तयार झाला.
अशा प्रगतीपथावर असलेल्या पोंढे गावावर सध्या प्रशासनाच्या मनमानीमुळे कारभारामुळे दोन-दोन खडी मशीनचे मोठे संकट उभे ठाकले आहे. शासन निर्णयानुसार असणाऱ्या सर्व परवानग्या योग्य पद्धतीने घेऊनच धनदांडग्यांनी खडी मशीन प्रकल्प सुरू करणे गरजेचे होते; मात्र खडी मशीन प्रकल्पाच्या फाइलवर आर्थिक ओझे ठेवून फायली सुसाट या टेबलवरून दुसऱ्या टेबलवर सरकवल्या जात आहेत. आर्थिक ओझ्याखाली शासनाचे नियम तितकेच बरबटले जात आहेत. त्याच वेगाने परवानग्या मिळत आहेत. यासाठी नियमांचे किंचितही पालन केले जात नाही. यासाठी प्रशासनातील अनेक अधिकारी धनदांडग्यांना सहकार्य करत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
विशेष ग्रामसभेमधून खडी मशीन विरोधात बहुमताने ठराव होऊनही ग्रामस्थांच्या भावनेला व ग्रामसभेच्या अधिकाराला प्रशासन जुमानत नाही. आर्थिक ओझ्याखाली दाबल्याने ग्रामसभेचे अधिकार देखील मातीत मिळविले जात आहेत. यामुळे ग्रामस्थांचा, ग्रामसभेचा तीव्र विरोध असूनही अनेक प्रकल्पांना प्रशासन परवानगी देत आहे. परिणामी ग्रामस्थानी न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न उपस्थित केला आहे.
राजकीय पॉवर अपेक्षित
निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष पोंढे गावात येऊन पुष्कळ आश्वासने देऊन जातात. आज पोंढे गावावर खडी मशीन सारखे भयंकर मोठे संकट उभे ठाकले आहे. या प्रकल्पामुळे गावचे भविष्य धोक्यात येणार आहे. येणाऱ्या अनेक पिढ्या यामुळे विस्थापित होतील. याच राजकीय मंडळींनी कार्यान्वित केलेली पुरंदर उपसा सिंचन योजनेमुळे दुष्काळी पोंढे गावची बागायती म्हणून झालेली ओळख पुन्हा पुसण्याचा मार्गावर आहे. यामुळे भविष्यातील अनेक पिढ्यांच्या भवितव्याचा विचार करता हे प्रकल्प रद्द होणे गरजेचे आहे. यासाठी राजकीय पॉवर मिळणे येथील ग्रामस्थांना अपेक्षित आहे.