पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील बेकायदेशीर रूफ टॉप हॉटेल्स काही महिन्यांपासून प्रशासनाच्या रडारवर आली असून, जिल्हाधिकार्यांनी नेमलेल्या समितीने 26 रूफ टॉप हॉटेलला नोटीस बजावली आहे. परवाना वेगळ्या जागेचा घेऊन रूफ टॉपवर हॉटेल सुरू करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम यांनी दिली.
शहरात महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण नियमावलीला हरताळ फासत उंच इमारतींच्या हॉटेलवर शेड टाकून धोकादायक स्वरूपात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स सुरू आहेत.
अनेक रूफ टॉप हॉटेल्समध्ये आगीच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून महापालिकेने अशा हॉटेल्सवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, कारवाई केल्यानंतर पुन्हा ही हॉटेल्स सुरू होतात. अनेक हॉटेलचालकांनी अशा रूफ टॉपफसाठी उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांची परवानगी घेतलेली आहे. त्यामुळे कारवाईत अडथळे येत असल्याने जिल्हा प्रशासनाने याबाबत संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी महापालिकेने केली होती.
मात्र, ही बैठक झालेली नसली तरी उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाकडून अशा हॉटेलच्या तपासणीसाठी जिल्हाधिकार्यांनी पथक नेमले असून, या पथकाने आतापर्यंत 26 हॉटेलला नोटीस बजाविली आहे. त्यानुसार, त्यांना नियमभंग झाल्याने परवाना रद्द का करू नये, अशी विचारणा करण्यात आली असून, त्यांच्याकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.
रूफ टॉपवर हॉटेल उभारण्यास बंदी असली, तरी या हॉटेलला उत्पादन शुल्क विभाग व पोलिस परवानगी देतात. मात्र, संबंधित हॉटेलसाठीची जागा अधिकृत आहे की नाही याची खातरजमा हे दोन्ही विभाग करत नाही. त्यामुळे अनधिकृतपणे नियमभंग करून हॉटेल सुरू असल्यास महापालिका कारवाईची नोटीस बजावते अथवा कारवाई सुरू करते.
तेव्हा या दोन्ही विभागांचा परवाना महापालिकेस दाखविला जातो. त्यामुळे महापालिकेस कारवाईत अडथळे येतात. त्यामुळे या तिन्ही विभागांमध्ये समन्वय ठेवून अशा प्रस्तावांसाठी आता महापालिकेचीही एनओसी घेतली जाणार असून, त्याबाबत जिल्हा प्रशासन सकारात्मक असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा.
हेही वाचा