Pune News : भरणेवाडीची बिरोबा यात्रा होणार साध्या पद्धतीने, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निर्णय : दत्तात्रय भरणे

pune bharanewadi biroba yatra
Published on: 
Updated on: 

वालचंदनगर : राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने महाराष्ट्रातील धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या भरणेवाडी येथील बिरोबा देवस्थानची यात्रा साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.

इंदापूर तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या भरणेवाडी येथील बिरोबा देवस्थानची स्थापना १८३० मध्ये कै. जगन्नाथ बाबा भरणे यांनी केली असून, तब्बल १९६ वर्षांपासून या ठिकाणी मोठ्या उत्साहाने यात्रा भरवली जाते. यात्रेनिमित्त घटस्थापना, देवाचे पारणे, देवाचा छबिना, धनगरी ओव्या आणि गजे ढोल हे यात्रेचे मुख्य आकर्षण असतात. त्यामुळे या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात.

यंदाची यात्रा २९ ऑक्टोबर रोजी होणार होती; मात्र सध्या 'अल निनो'च्या प्रभावामुळे राज्यात तीव्र दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भाविकांचे आर्थिक गणित कोलमडू नये म्हणून बिरोबा देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांशी चर्चा करून यंदा यात्रा अत्यंत साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच भाविकांनी कोणताही अनावश्यक खर्च टाळावा, असे आवाहन भरणे यांनी केले.

या वेळी अधिक माहिती देताना देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिकेत भरणे म्हणाले, "यात्रेच्या निमित्ताने केवळ धार्मिक विधी पार पडणार असून सर्व प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच यात्रेचा अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्त भागात जास्तीत जास्त मदत करण्याचा मानस आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news