

ओतूर : येथील के. टी. बंधाऱ्यात बुडून एका १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. ८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
देवप्रकाश कुमार (वय १५) असे मृत मुलाचे नाव असून, तो ओतूर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. सायंकाळच्या सुमारास के. टी. बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेल्यानंतर तो पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मुलाला बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची नोंद ओतूर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास ओतूर पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर धरणे, बंधारे व खोल पाण्याच्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांनी तसेच विशेषतः युवक व लहान मुलांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.