Pune Accident : नाणेघाटाच्या दरीत पडून तरुणाचा मृत्यू, मित्रांसोबतची पावसाळी भटकंती ठरली अखेरची

naneghat accident : नानाचा अंगठा परिसरात पाय घसरून खोल दरीत पडून मृत्यू
pune naneghat accident youth dies
Published on
Updated on

लेण्याद्री : पावसाळ्यात निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी नाणेघाट परिसरात गेलेल्या चार मित्रांच्या सहलीचा शेवट हृदयद्रावक ठरला. आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील दत्ता विनायक लोंढे (वय २२) याचा नानाचा अंगठा परिसरात पाय घसरून खोल दरीत पडून मृत्यू झाला. शोधमोहीमेनंतर मुरबाड येथील सह्यगिरी रेस्क्यू टीमने त्याचा मृतदेह शोधून काढला.

नाणेघाटातील नानाचा अंगठा परिसरात दत्ता लोंढे, तेजस काटे, सुनील पवार आणि अनिकेत ढोबळे हे चौघे मित्र सोमवारी (दि. २०) फिरण्यासाठी गेले होते. मात्र, दत्ता हा 'मी अर्ध्या वाटेतून परत जातो' असे सांगून खाली निघाला. काही वेळाने इतर मित्र पार्किंगमध्ये परतले असता दत्ता तेथे नसल्याचे लक्षात आले. परिसरात शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही.

घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन पथक, वन विभाग आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. मात्र मुसळधार पाऊस, दाट धुके आणि खोल दरीमुळे शोधकार्याला मोठ्या अडचणी आल्या. घटनास्थळी दत्ताची एक चप्पल आणि घसरल्याच्या खुणा आढळल्याने तो दरीत पडल्याचा संशय बळावला.

थर्मल ड्रोनच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु प्रतिकूल हवामानामुळे रात्री शोधमोहीम थांबवावी लागली. हे शोधकार्य मंगळवारी (दि. २१) सकाळी पुन्हा सुरू करण्यात आले. मुरबाड येथील दीपक विशे यांच्या नेतृत्वाखालील सह्यगिरी रेस्क्यू टीमने साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास घोणे घाट परिसरातून दत्ताचा मृतदेह शोधून बाहेर काढला.

या बचाव मोहिमेत कुसुम विशे, संदेश गपाट, हेमंत ठोंबरे, रामदास ठोंबरे, मारुती वाघ, हरि लोबी आणि समीर ठोंबरे यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच जुन्नरचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड, वनविभागाच्या वतीने जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानेही सहकार्य केले. या घटनेनंतर प्रशासनाने पर्यटकांना पावसाळ्यात डोंगर-दऱ्यांमध्ये फिरताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे, धोकादायक ठिकाणे टाळण्याचे आणि सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

सह्यगिरी रेस्क्यू टीमचे प्रमुख दीपक विशे यांनी सांगितले की, यंदाच्या वर्षात टीमने आतापर्यंत दहा बचाव मोहिमा पार पाडल्या आहेत. त्यापैकी सहा मोहिमांमध्ये २० ते २५ वयोगटातील तरुणांचे मृतदेह शोधावे लागले आहेत. भटकंतीचा आनंद घ्या, पण जीव धोक्यात घालणारे धाडस करू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news