

सुनील माळी
स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसची असलेली लोकप्रियता स्वातंत्र्यानंतरही बरीच वर्षे टिकून राहिली होती आणि त्यामुळेच एकामागून एक लोकसभेच्या निवडणुका जिंकत दिल्लीतली आणि एकामागून एक विधानसभेच्या निवडणुका जिंकत मुंबईची सत्ता काँग्रेसने राखली; पण आपल्या पुण्यात? आपले पुणेकर पहिल्यापासूनच हटके विचार करणारे, त्यामुळे पुणेकरांनी पुणे महापालिकेत एक अपवाद वगळता प्रदीर्घ काळ काँग्रेसला एकहाती बहुमताची सत्ता देण्याचे नाकारले होते. आहेत की नाही आमचे पुणेकर स्वतंत्र बाण्याचे?(Latest Pune News)
आपल्याला स्वातंत्र्य मिळाले 1947 मध्ये आणि ते मिळविण्यात मोठा वाटा होता काँग्रेसचा. त्यामुळे काँग्रेस देशात कमालीची लोकप्रिय होती. मग काय? लोकसभेच्या आणि त्यापाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकीत त्या पक्षाला यश मिळत गेले. तेही साधेसुधे नाही, तर सणसणीत. स्वातंत्र्यानंतरची तीस वर्षे काँग्रेसने लोकसभेत सलग राज्य केले. आणीबाणीच्या चुकीच्या पावलाने त्या पक्षावर समाजमन रुसले आणि 1977 मध्ये तो पक्ष सत्तेपासून दूर फेकला गेला. अर्थात, त्यानंतर 1980 मध्ये काँग्रेसने पुन्हा सत्ता काबीज केली. लोकसभेच्या एकूण 17 निवडणुकांपैकी तब्बल 10 निवडणुका काँग्रेसने जिंकल्या, तर योगायोगाचा भाग म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्याही दहाच निवडणुका काँग्रेसने जिंकल्या; मात्र 2014 नंतरच्या मोदी लाटेने परिस्थिती पार बदलून गेली, तरी दहा निवडणुकांमध्ये काँग्रेसची सद्दी होती. या काँग्रेसच्या सुगीच्या काळात पुणे महापालिकेत पुणेकरांनी कुणाला कौल दिला होता..? ते आता आपण पाहू.
पुणे महापालिकेची स्थापना झाली ती 1950 मध्ये. महापालिकेच्या स्थापनेनंतरच्या तब्बल 75 वर्षांत एकूण 13 निवडणुका झाल्या. या तेरा निवडणुकांपैकी तब्बल सहा ते सात निवडणुकांमध्ये काँग्रेसला विरोधकांशी चांगलेच झुंजावे लागले. देशात आणि राज्यात स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस एकतर्फी विजय मिळवत असताना पुणेकरांनी पहिल्या काही दशकांमध्ये पुणे महापालिकेत काँग्रेसला एकहाती सत्ता दिली नव्हती. 1952 मध्ये झालेल्या महापालिकेच्या पहिल्या-वहिल्या निवडणुकीत नागरी संघटना सत्तेवर आली आणि संघटनेचे बाबूराव सणस पुण्याचे पहिले महापौर झाले. त्यानंतर 1957 मध्ये संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन पेटलेले असताना संयुक्त महाराष्ट्र समितीला पुणेकरांनी कौल दिला तसेच नागरी संघटनेचेही अनेक जण निवडून आले. काँग्रेसच्या अनेक जणांनी निवडणूक लढवली, तरी त्या पक्षाने पक्षीय पातळीवर ती निवडणूक लढवलीच नव्हती. नागरी संघटनेचे संख्याबळही लक्षणीय असल्याने संघटनेतर्फे भाऊसाहेब शिरोळे महापौर झाले.
पुणेकरांनी 1962 मध्ये पुन्हा नागरी संघटनेवर विश्वास टाकला. त्यानंतर मात्र 1967 मध्ये काँग्रेस प्रथम सत्तेवर आली, त्याचे श्रेय यशवंतराव चव्हाण यांच्या बेरजेच्या राजकारणाला आणि इतर काही मुद्द्यांना जाते. तथापि, त्यापुढच्या निवडणुकीपासून म्हणजेच 1974 पासून काँग्रेसला पुन्हा संघर्ष करावा लागला तो थेट 1992 पर्यंत. पुणे महापालिकेत 1974 मध्ये पुन्हा नागरी संघटनेचे प्राबल्य निर्माण झाले. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरील जनता पक्षाच्या प्रयोगाचा परिणाम पुणे महापालिकेतही होऊन 1979 मध्ये जनता पक्षाचे पारडे जड झाले. मात्र, नंतर काँग््रेासने इतर पक्षांशी आघाडी केली. काँग्रेसविरोधक जनता पक्ष, समाजवादी, महाराष्ट्र एकीकरण समिती, कम्युनिस्ट पक्ष आदी 1985 च्या निवडणुकीत काँग्रेसविरोधात एकवटले.
...याचा अर्थ काय लावायचा? या निवडणुकांच्या निकालांचा निष्कर्ष काय काढायचा? तर, देशातली केंद्राची सत्ता सलग प्रदीर्घ काळ काँग्रेसकडे गेली आणि राज्यातही त्याचीच पुनरावृत्ती झाली, तरी पुणेकरांनी स्थानिक निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. पुणेकरांनी स्वातंत्र्यानंतरच्या या पहिल्या काही दशकांमध्ये लोकसभेला आणि विधानसभेला काँग्रेसचेच उमेदवार पाठविले. पण, स्थानिक पातळीवर वेगळा विचार केला; मात्र जेव्हा काँग्रेसविरोधी पक्षांच्या बाजूने देशात किंवा राज्यात लाट असेल तेव्हा मात्र स्थानिक निवडणुकीत काँग्रेसविरोधी पक्षांना पुणेकरांनी झुकते माप दिले.
असे आहेत पुणेकर..!!