पुणे: पुण्यातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे वाट लागली आहे. या खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहे. पालिकेकडे या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून नागरिकांचा जनक्षोभ लक्षात घेता, पुणे महानगरपालिकेने शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण पुणे शहर खड्डेमुक्त करण्यात येईल, असा निर्धार आयुक्त नवल किशोर राम यांनी केला आहे.
पावसाळ्यात दरवर्षी शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दरवर्षी वाट लागते. यावर्षीही रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पुणेकरांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या सलग तीन वर्षांपासून पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे पुणे महानगरपालिका प्रशासनाला टीकेचा सामना करावा लागत आहे. (Latest Pune News)
शहरातील चालू पाणीपुरवठा योजना, सांडपाणी व्यवस्थापन, खाजगी कंपन्या आणि इतर प्रकल्पांसाठी वर्षभर खोदकाम केले जाते. जिथे खोदकाम होते तिथे जास्त खड्डे पडतात. काही ठिकाणी रस्ते विभागाने आधीच रस्ते तयार केल्यावरही विविध कामांसाठी रस्ते पुन्हा खोदले जात असल्याने चांगल्या रस्त्यांची पुन्हा वाट लागत असल्याने याचा मनस्ताप पुणेकरांना सहन करावा लागत आहे.
याची दखल महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतली आहे. येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत शहर खड्डेमुक्त करण्याचा निर्धार राम यांनी केला आहे. यासाठी लवकरच महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरण्याची मोहीम सुरू केली जाणार असून, ही कामे त्वरित पूर्ण केली जाणार आहेत.
या संदर्भात माहिती देताना राम म्हणाले, नोव्हेंबर अखेरपर्यंत सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील. पावसामुळे पाणी साचल्याने आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे रहिवासी त्रस्त आहेत. अनेक ठिकाणी मोठे खड्डे आहेत, ज्यामुळे अपघात होतात. अशा तक्रारी सातत्याने येत आहेत. हे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी दर्जेदार काम केले जाईल.
पीएमसी रोड मित्र वर तक्रारींचा पाऊस
पुणे महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांवरील खड्डे, पदपथ आणि रस्त्यांच्या स्थितीबद्दल थेट तक्रार करण्यासाठी पीएमसी रोड मित्र मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले आहे. या ॲपद्वारे नागरिक खड्ड्यांबाबत थेट महापालिकेच्या रस्ते विभागाला तक्रार करू शकतात. पीएमसी रोड मित्र ॲपवर आतापर्यंत हजारो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. रस्ते विभाग या तक्रारींवर कारवाई करत आहे. त्यामुळे आता महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी स्वतंत्र मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.