

Naval Kishore Ram on Maharashtra Navnirman Sena
पुणे : "मराठी संस्कृतीला बदनाम करणारे तुम्ही गुंड आहात," अशा कडक शब्दांत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नेत्यांना सुनावले. आयुक्तांच्या या विधानामुळे मनसैनिक संतापले आणि त्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेरच ठिय्या मांडला. या प्रकरणामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता.
महापालिकेत सुरू असलेल्या बैठकीदरम्यान मनसेचे काही कार्यकर्ते आणि नेते थेट आयुक्तांच्या दालनात गेले. बैठक सुरू असताना विनापरवानगी दालनात प्रवेश केल्याने आयुक्त नवकिशोल राम संतापले. त्यांनी मनसे नेत्यांना खडे बोल सुनावत नियमांची आठवण करून दिली. मनसैनिकांनी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडत घोषणाबाजी केली. आयुक्तही दालनाबाहेर आले आणि त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या मनसैनिकांना सुनावलं.
आयुक्त काय म्हणाले?
"माझी महापालिकेच्या 40-50 अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू होती. ही बैठक सुरू असतानाच मीटिंग हॉलमध्ये अचानक तीन - चार जण घुसले. "मी दोन वेळा नगरसेवक होतो", असं त्यामधील एकानं मला सांगितलं. त्यांच्या हातात काही कागद नव्हता. जर त्यांना निवेदन द्यायचं होतं तर त्यांनी मला सांगितलं पाहिजे होते. ही मीटिंग कधीपर्यंत चालेल असं ती लोकं मला विचारत होती. तुम्ही मला ओळखत नाही असं म्हणत ती लोक माझ्या अंगावर धावून आली", असा गंभीर आरोप आयुक्तांनी पत्रकार परिषदेत केला.
मी बोलण्याच्या ओघात त्यांना हिंदीत ‘बाहेर चलो’ असं सांगितलं. हा एक शब्द पकडून त्यांनी मला मराठीत बोला असं सांगत माझ्याशी हुज्जत घातली. मी दिवसभर बैठकांमध्ये मराठीतच अधिकाऱ्यांशी संवाद साधतो.
नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महानगरपालिका
याप्रकरणी मी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. मला आजवर असा अनुभव कधीच आला नव्हता, असंही आयुक्तांनी सांगितले.
दुसरीकडे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आयुक्तांनी गुंड म्हटल्याचे वृत्त समजताच मनसैनिकांनी पुणे महापालिकेबाहेर गर्दी केली. आयुक्तांना भेटायला गेलेल्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनासमोरच आंदोलनाला सुरूवात केली. तर बाहेर जमलेले कार्यकर्ते आयुक्तांचे दालन ज्या मजल्यावर आहे तिथे जाण्याच्या प्रयत्नात होते. शेवटी पोलीस आणि सुरक्षारक्षकांनी मजल्याचे प्रवेशद्वार बंद केले. या प्रकरणामुळे पुणे महापालिकेत काही काळ तणाव निर्माण झाला होता.
मनसे नेत्याने काय सांगितले?
किशोर शिंदे हे मनसेचे पदाधिकारी असून त्यांनी कोथरूडमधून विधानसभा निवडणूक लढवली आहे. किशोर शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते आयुक्तांना भेटायला गेले होते. 'आयुक्तांनी मला घरात घुसून मारण्याची धमकी दिली. आम्हाला आयुक्तांना निवेदन द्यायचे होते. पण आयुक्तांनी आमचं म्हणणं ऐकून न घेता तू कोण आहेस, तुला माज आहे का, तुला महाराष्ट्रातून बाहेर काढतो', अशी धमकी दिल्याचा आरोप किशोर शिंदेंनी केला.