

पुणे : पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी (४ जून) सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने काकडे यांचाच एकमेव अर्ज शिल्लक राहिला आहे. निवडणूक प्रक्रियेनुसार अधिकृत घोषणा २२ जून २०२६ रोजी करण्यात येणार असली, तरी काकडे यांच्या विजयावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.
महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला होता. त्यामुळे पक्षाने विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली होती. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला देण्यात आली होती. त्यानुसार श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती.
मात्र, महायुतीचा धर्म पाळत प्रदीप कंद यांनी अखेर आपला अर्ज मागे घेतला. तर महाविकास आघाडीच्या मतदारांची संख्या तुलनेने कमी असल्याने श्रीकांत पाटील यांनीही माघार घेतल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. त्यांच्या माघारीनंतर निवडणुकीतील चुरस संपुष्टात आली.
याशिवाय माजी आमदार सुनील टिंगरे, तुषार कामठे आणि सुनील जरे या अपक्ष उमेदवारांनीदेखील आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात केवळ विक्रम काकडे यांचाच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिला.
उमेदवारी अर्ज माघारीनंतर पाच उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची अधिकृत घोषणा प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गजानन पाटील यांनी केली. या घडामोडीनंतर पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला असून, विक्रम काकडे यांची विधानपरिषदेतील एंट्री आता केवळ औपचारिकतेपुरतीच बाकी राहिली आहे.