पुणे : राज्यातील पहिल्या हायड्रोजन बसची ट्रायल रन पुण्यात बुधवारी (दि.15) रोजी यशस्वी झाली. या बस आगामी काळात पीएमपीच्या ताफ्यात लवकरच आणण्याचे नियोजन आहे. याकरिता पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे आणि ‘मेडा’चे महासंचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी पुढाकार घेतला आहे. (Latest Pune News)
पुण्यातील औंध येथील ‘मेडा’च्या कार्यालयात बुधवारी ही ट्रायल रन झाली. मेडा (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, महाऊर्जा) कार्यालय ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून पुन्हा मेडा कार्यालय अशी ‘ट्रायल रन’ या वेळी झाली. या वेळी झालेल्या ट्रायल रनदरम्यान बसमध्ये पीएमपी अध्यक्ष पंकज देवरे, मेडाचे प्रकल्प महाव्यवस्थापक आनंद रायदुर्ग, नॅशनल केमिकल लॅबोटरीचे डॉ. आशिष लेले, सीआयआरटीचे संचालक देवेंद्र सिंग, इंडियन ऑईलचे आलोक सिंग, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुजीत डोंगरजाळ, पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे, पीएमपीचे वाहतूक अधिकारी नारायण करडे व अन्य उपस्थित होते
पंकज देवरे म्हणाले, पुण्यामध्ये राज्यातील पहिल्या हायड्रोजन बसची ट्रायल रन घेण्यात आली. मेडा, पीएमपीएमएल, आयओसीएल आणि टाटा यांच्या संयुक्त विद्यमाने ही ट्रायल रन घेण्यात आली. पुढील सात दिवस ही ट्रायल रन चालणार आहे. याकरिता आम्ही सात मार्गांची निवड केली आहे. ही ट्रायल रन झाल्यावर संचालक मंडळाच्या बैठकीत या बस खरेदीचा प्रस्ताव ठेवला जाईल. त्याला मंजुरी मिळाल्यावर लगेचच या बस पुणेकरांच्या सेवेसाठी आणल्या जातील.
आनंद रायदुर्ग म्हणाले, ‘महाराष्ट्र ग्रीन एनर्जी’ची शासनाने घोषणा केली आहे, मेडा त्याकरिता नोडल एजन्सी म्हणून काम करत आहे. ग्रीन पॉलिसीला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. या बस खरेदी करण्यासाठी ‘महाराष्ट्र गव्हर्मेंट’ने 30 टक्के सबसिडी दिली आहे. त्याअंतर्गत या बसची खरेदी केली जाणार आहे. या बसद्वारे वायूप्रदूषण शून्य होणार आहे. पेट्रोल, डिझेल आयातीवरचा यामुळे खर्च कमी होणार आहे. ‘टाटा मोटर्स’मार्फत ही बस तयार करण्यात येत आहे. या बसची किंमत अडीच ते तीन कोटी असणार आहे. मात्र, शासनाच्या अनुदानामुळे कॉर्पोरेशनला या बस दोन कोटींपर्यंत मिळणार आहेत. जवळपास एक कोटींपर्यंत सबसिडी मिळणार आहे.