

खेड : काळेचीवाडी (ता.खेड) येथील एका फॉर्म हाऊसमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा लहान मुलगा बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. ही धक्कादायक घटना २७ ऑक्टोबर रोजी रात्री घडली असून, बिबट्याच्या थरारक हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी वनविभागाला पिंजरा लावून दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.
काळेचीवाडी येथे घराच्या अंगणात लहान मुलगा झोक्यावर खेळत असताना समोरून मांजर धावत गेले. त्याच्या मागे शिकार करण्यासाठी बिबट्या थेट कंपाऊंडमध्ये घुसला. प्रसंगावधान दाखवत मुलाने झोका सोडून घरात धाव घेतली. कुटुंबीयांनी आरडा-ओरड केल्याने बिबट्या माघारी फिरला. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे नुकताच १४ वर्षीय रोहन बोंबे याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतरच्या आंदोलनानंतरही अशा घटना घडत असल्याने नागरिक संतप्त आहेत. मंगळवारी (दि. ४) रात्री राजगुरुनगर येथील तिन्हेवाडी रस्ता व सातकरस्थळ गावातही बिबट्याने दर्शन दिले. काळेचीवाडी व सातकरस्थळ येथे बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरे लावले आहेत. स्थानिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.