

Pune Junnar Leopard News
ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर आणि परिसरात बिबट्यांची दहशत कायम असून आता बिबटे थेट गल्ली, बोळात घुसून पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडीत आहेत. आता बिबट्याने थेट ओतूर गावठाणमधील देवगल्लीतील दोन पाळीव कुत्र्यांवर हल्ला करत त्यांना ठार केले आहे.
देवगल्ली येथील वैद्य बोळात प्रशांत लक्ष्मण दांगट राहतात. त्यांच्या घरासमोरच्या बंदिस्त अंगणात त्यांचे दोन पाळीव कुत्रे सोडलेले होते. रविवारी रात्री ११ वाजण्याचे सुमारास बिबट्याने पत्र्याचे कंपाऊंड वरून उडी मारून आत प्रवेश केला. त्यानंतर त्याने तेथील दोन्ही कुत्र्यांवर हल्ला केला. त्यात एक कुत्रा जागीच ठार झाला.
दरम्यान, बाहेरील आवाजाने प्रशांत दांगट यांनी घराबाहेरची लाईट लाऊन दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांना बिबट्याने एक कुत्रा जबड्यात पकडून कंपाऊंडवरून छलांग मारताना पाहिले. बिबट्या एका कुत्र्याला घेऊन पसार झाला होता. याबाबत दांगट यांच्या शेजारील प्रत्यक्षदर्शी विवेक घोलप यांनी सांगितले की, या गल्लीत आतापर्यंत बिबट्याने १० ते १२ वेळा दर्शन दिले आहे. त्याने अनेक भटक्या कुत्र्यांची शिकार केलेली आहे.
घटनास्थळी मिळून आलेल्या बिबट्याच्या पायाचे ठसे पहाता हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला मजबूत शरीरयष्टी असल्याचे लक्षात येते. या परिसरात अत्यंत दाट लोकवस्ती असूनही बिबट्या गल्लीत प्रवेश करीत असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे. या घटनेने परिसरातील रहिवाशांमध्ये दहशत पसरली आहे.
हा बिबट्या कदाचित घरात घुसून मानवी हल्ला करण्याची शक्यता असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना होण्यापूर्वीच वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी येथील नागरिकांनी मागणी केली आहे. या घटनेची माहिती ओतूर वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनकर्मचारी सारिका बुट्टे यांना कळविण्यात आली आहे.