पुणे : उन्हाळी सुटी पडल्यामुळे उत्तरेकडे जाणार्या विमानांसह रेल्वेगाड्यांनाही सध्या प्रचंड गर्दी झाली आहे. अशीच तुफान गर्दी बुधवारी (दि.02) उत्तरेकडे जाणार्या पुणे-जम्मूतावी-झेलम एक्स्प्रेसला झाल्याचे चित्र दिसले. येथे सायंकाळी चारच्या सुमारास जम्मूतावी (झेलम एक्स्प्रेस), दानापूर एक्स्प्रेस गाडीसाठी रांगा लागल्याचे दिसून आले.
उन्हाळी सुट्या लागल्यामुळे भरपूर नागरिक आपल्या कुटुंबीयांसह उत्तर भागातील थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनासाठी निघाले आहेत. त्यामुळे रेल्वेचं काय पण, उत्तरेकडे झेपावणार्या विमानांनादेखील गर्दी झाल्याचे सध्या चित्र दिसत आहेत. नियमित विमाने आणि रेल्वे गाड्यांपेक्षा अतिरिक्त विशेष नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. तसेच, गर्दी नियंत्रणासाठी विविध उपाययोजना देखील केल्या जात आहेत. बुधवारी (दि.2) दै.‘पुढारी’च्या प्रतिनिधीने उन्हाळ्यानिमित्त पुणे रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी आणि यामुळे प्रवाशांना भेडसावणार्या समस्यांची माहिती घेण्यासाठी पाहणी केली. यावेळी पुणे रेल्वे स्थानकावरून बाहेरगावी जाणार्या सर्वच गाड्या फुल्ल असल्याचे चित्र दिसले. मात्र, यात विशेष करून उत्तरेकडे सांयकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी जाणारी पुणे-जम्मूतावी-पुणे झेलम एक्स्प्रेसला (ट्रेन क्र.11077) तुफान गर्दी झाल्याचे चित्र दिसले. इतकेच नव्हे तर गर्दीमुळे येथे अनुचित घटना घडू नये, याकरिता रेल्वे प्रशासनाला येथे रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने प्रवाशांच्या रांगा लावाव्या लागल्या. या रांगा खूपच लांब लागल्या होत्या.
उन्हाळ्यानिमित्त बाहेरगावी जाणार्या प्रवाशांची पुणे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी होत आहे. बुधवारी सायंकाळी 5.20 वाजता सुटणार्या जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस आणि रात्री साडेआठ-नऊच्या सुमारास सुटणार्या दानापूर एक्स्प्रेसला तुफान गर्दी झाली होती. हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने 20 आरपीएफ, 20 टीसींसह एक नोडल अधिकार्याची नेमणूक येथे केली होती. सायंकाळी सुटणार्या या गाड्यांसाठी प्रवाशांनी बुधवारी सकाळपासूनच गर्दी केली होती. यामुळे अधिकार्यांनी गर्दी नियंत्रणासाठी सकाळपासूनच या गाड्यांच्या प्रवाशांच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर रांगा लावल्या होत्या. रांगा लावूनही येथे प्रचंड गर्दी झाली होती. ती आटोक्यात आणताना रेल्वे अधिकारी, आरपीएफ जवानांच्या नाकीनऊ आल्याचे चित्र दिसले.
उन्हाळ्यानिमित्त स्थानकावर होणारी गर्दी लक्षात घेता, पुणे रेल्वे स्थानकावर गर्दी नियंत्रणासाठी आरपीएफ, टीसींसह नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. याशिवाय पुणे विभागातून नियमित गाड्यांव्यतिरिक्त 15 जादा उन्हाळी विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या उन्हाळी विशेष गाड्यांच्या दि. 2 एप्रिल ते 30 जूनपर्यंत तब्बल 522 अतिरिक्त फेर्या होणार आहेत. या उन्हाळी विशेष गाड्या पुणे विभागातून इंदौर, नागपूर, कलबुर्गी, दानापूर, जयपूर, गाझीपेठ, कटिहार, भोपाळ यांसह अन्य काही उत्तर आणि दक्षिण भागाकडे धावणार आहेत
डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग