Pune : रात्री दहानंतर रस्त्यावर चालणे अवघड..!

Pune : रात्री दहानंतर रस्त्यावर चालणे अवघड..!

वडगाव शेरी : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर दिवसा शांत, सुंदर, रस्त्यावर कमी वर्दळीचा परिसर असतो. पण, रात्रीचे आठ वाजल्यानंतर रात्रीचा गाण्यांचे आवाज, गाड्यांची गर्दी सुरू होते.. पबमधून बाहेर पडणारे मद्यपी वेगाने गाड्या चालवतात. मद्यपींची वेगवान गाडी कधीही जीव घेईल. या भीतीने स्थानिक नागरिक रात्रीचे बाहेर शतपावली करण्यासाठी पडत नाहीत. पुणे शहरातील सर्वांत शांत परिसर म्हणून कल्याणीनगर ओळखले जात होते. पण, गेल्या काही वर्षांपासून कल्याणीनगरमध्ये पबची संख्या वाढली आहे. कल्याणीनगर- कोरेगाव पार्क पूल ते विमानतळ रस्त्यावर शहरातील नामांकित पब आहेत. हे पब रात्री आठनंतर सुरू होतात.

रात्री कल्याणीनगरमध्ये आलिशान चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर तरुण- तरुणी फिरताना दिसतात. बुधवारी, शनिवारी आणि रविवारी या परिसरामध्ये मोठ्या नामांकित डीजेंच्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील तरुण कल्याणीनगरमधील पबमध्ये गर्दी करतात. या पबच्या पार्ट्या रात्री तीन वाजेपर्यंत चालतात. रात्री अकरा वाजल्यानंतर रस्त्यावर मद्यपी वाहने घेऊन येतात. वेगाने वाहने चालवतात. मद्यधुंद झालेले तरुण मध्यरात्री एक ते दोन यादरम्यान अनेकदा इम्पोर्टेड वाहनांच्या शर्यती लावतात. वेगाने वाहन चालवतात. या शर्यतीमध्ये तोल जाऊन अपघात होतात.

या पब कल्चरने कल्याणीनगर परिसराची शांतता भंग केली आहे. स्थानिक नागरिकांनी कल्याणीनगरमधील पबवर कारवाई करण्यासाठी अनेकदा पोलिस प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार, पोलिस आयुक्तांनी काही दिवस पबना कडक नियम केले. मात्र, पुन्हा स्थिती पहिल्यासारखी झाली. यामुळे कल्याणीनगरमध्ये रात्री सामान्य नागरिकांना फिरणे अवघड झाले आहे. कोणती गाडी मागून येऊन उडवेल, अशी भीती कायम मनात असते. त्यामुळे नागरिकांनी रात्रीचे बाहेर पडणे बंद केले आहे.

पबमधील गाण्यांचा आवाज 10 नंतर कमी करावा. कल्याणी नगरमध्ये रात्री पबमधून बाहेर पडणारे मद्यपी वेगाने गाड्या चालवतात. रात्री दोन ते तीनपर्यंत पब सुरू असतात. पण, या सगळ्या गोष्टींकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. शासनाचे नियम न पाळणार्‍या पबमालकांना कठोर शिक्षा केली पाहिजे.

-डॉ. हाजी जाकीर, रहिवासी

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news