

पुणे : शहरावर तब्बल १०० तासांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने, गेल्या ४८ तासांत झालेल्या झाडपडीमुळे अनेक भागांतील उभ्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. कार, रिक्षा आणि दुचाकींवर मोठी झाडे कोसळली. जांभुळवाडी भागात पार्किंग शेडवर सीमाभिंत कोसळल्याने नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नसली तरी, अग्निशमन दलाची गेल्या ४८ तासांपासून प्रचंड धावपळ सुरू आहे. रस्त्यांवर आणि गाड्यांवर पडलेली झाडे कापून बाजूला करताना जवानांची दमछाक होत आहे.
रविवारी पहाटे ३ वाजून २४ मिनिटांनी समृद्धी लेक सोसायटी (जांभुळवाडी रोड) येथे संततधार पावसामुळे सोसायटीची सीमाभिंत पार्किंग शेडवर कोसळली. त्यामुळे लोखंडी शेड संपूर्णपणे खाली आले. यात खाली पार्क केलेल्या अनेक चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच कात्रज व सिंहगड अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. फॅब्रिकेशन करणाऱ्या टीमच्या मदतीने जवानांनी लोखंडी अँगल आणि पत्रे कापून बाजूला केले. यात सात चारचाकी आणि सात दुचाकींचे मोठे नुकसान झाले असून ती वाहने सुरक्षित बाहेर काढण्यात आली.
या कामगिरीत प्रभारी उपअग्निशमन अधिकारी संतोष भिलारे, फायरमन मयूर काटे, प्रशांत कुंभार, अक्षय देवकर तसेच सिंहगड अग्निशमन केंद्रातील फायरमन सुनील दिवाडकर, राकेश बरे, संभाजी आटोळे आणि आदिनाथ पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
शहरात शनिवारी ३५ पेक्षा जास्त, तर रविवारी १५ ते २० ठिकाणी वेगवेगळ्या भागांत झाडपडीच्या घटना घडल्या. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना गेल्या ४८ तासांपासून दिवसरात्र काम करावे लागत आहे. रविवारी शहरातील जांभुळवाडीसह वाकडेवाडी आणि कसबा पेठ भागातील उभ्या वाहनांवर झाडे उन्मळून पडली. यात चारचाकी, दुचाकी आणि रिक्षांचे प्रचंड नुकसान झाले. गेल्या दोन दिवसांत एकूण ५० ते ६० ठिकाणी झाडपडीच्या घटनांची नोंद झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, कुठेही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
चिंचवड : ७७ | दापोडी : ४३.५ | एनडीए : ४० | पाषाण : ३३.४
कोथरूड : ३६ | औंध : ३५.६ | कर्वेनगर : ३४.६ | खडकवासला : ३२.४
शिवाजीनगर : ३०.७ | ढोले रस्ता : ३०.४ | भवानी पेठ : २७.८ | विमाननगर : २५
बिबवेवाडी : २३.४ | वानवडी : २२.६ | कोंढवा : २१.८ | लवळे : १५.५
चिंचवड २७, लोहगाव १६.८, पाषाण १४, शिवाजीनगर १३.५, एनडीए १३, दापोडी १२, हडपसर ९, लवळे ७.