Pune Drugs Case | पबमधील ड्रग पार्टी; आठ जणांना अटक

पोलिसांकडून अमली पदार्थाचे सेवन करणार्‍यांचा शोध सुरू
Scenes from L3 pub
L3 पुबमधील काही दृश्ये File Photo
Published on
Updated on

पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील पबमधील पार्टीप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पबचालक, व्यवस्थापक आणि पार्टी आयोजकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करून त्यातील आठ जणांना अटक केली आहे. पार्टीमध्ये अमली पदार्थाचे सेवन करणार्‍या दोघांचा शोध घेण्यात येत आहे. दोन पोलिस अधिकार्‍यांचेदेखील निलंबन करण्यात आले आहे. पबमधील शौचालयात तिघे ड्रग घेत असतानाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला होता.

कोण आहेत आरोपी?

संतोष विठ्ठल कामठे, सचिन विठ्ठल कामठे (रा. शिवाजीनगर), उत्कर्ष कालिदास देशमाने (धानोरी), योगेंद्र गिरासे (भूगाव मुळशी), रवी माहेश्वरी (उंड्री), अक्षय दत्तात्रय कामठे (हडपसर), दिनेश मानकर (नाना पेठ), रोहन राजू गायकवाड (भोसले पार्क, हडपसर) आणि मानस पस्कुल मल्लिक (33, रा. येरवडा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील सतीश आणि संतोष कामठे लिक्विड लीजर लाउंज (एल 3) या पबचे मूळ मालक आहेत. त्यांच्याकडे पबचा परवाना आहे. देशमाने, गिरासे आणि माहेश्वरी यांनी कराराने हा पब चालवायला घेतला आहे. अक्षय कामठे हा पार्टीचा आयोजक होता, तर दिनेश मानकर हा डीजेचालक आहे. गायकवाड आणि मल्लिक यांनीही पार्टी आयोजनामध्ये सहभाग घेतला होता.

स्वच्छतागृहात अमली पदार्थांचे सेवन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पबमधील पार्टीच्या वेळी काही तरुण स्वच्छतागृहात अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याअनुषंगाने तपास केला असता, पबमध्ये विनापरवाना आणि बेकायदेशीर पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे आढळून आले. ही पार्टी वेळेचे उल्लंघन करून पहाटे साडेचारपर्यंत सुरू होती. येथे मद्य आणि सिगारेट विक्री केली गेली होती.

धूळफेक करून खासगी पार्टी सुरूच!

रात्री दीडनंतर पबचा पुढचा दरवाजा बंद करून पब बंद झाल्याचे आयोजकांकडून भासवण्यात आले होते. मात्र, मागील छोट्या दरवाजाने प्रवेश देऊन खासगी पार्टी आयोजित केली गेली होती. या पार्टीमध्ये 40 जण सहभागी झाले होते. नियमित ग्राहकांना वेळेप्रमाणे रात्री एक वाजता बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर ही पार्टी सुरू केली गेली. यासाठी डीजे चालवण्याचे काम दिनेश मानकरने पहाटेपर्यंत केले, तर पार्टीला मागच्या दरवाजातून प्रवेश देण्याचे काम रोहन गायकवाड याने केले.

चौघांवर निलंबनाची कारवाई

पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, तसेच रात्रपाळीत गस्त घालणारे सहायक निरीक्षक दिनेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. मध्यरात्रीनंतरही फर्ग्युसन रस्त्यावरील पब सुरू असल्याने कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत राज्य उत्पादन शुल्क विभागातील अनंत पाटील, विठ्ठल बोबडे या दोन निरीक्षकांनाही निलंबित करण्याचे आदेश सोमवारी रात्री देण्यात आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news