Graduate and Teachers’ Constituency Elections | प्रचार संपला; उद्या मतदान

‘पदवीधर, शिक्षक’ निवडणुकीसाठी प्रशासनाची जोरदार तयारी
Graduate and Teachers’ Constituency Elections |
Graduate and Teachers’ Constituency Elections | प्रचार संपला; उद्या मतदानpudhari photo
Published on: 
Updated on: 

पुणे : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विभागीय प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये शुक्रवार, २३ रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी खासगी आस्थापने, कंपन्या, मॉल्स आणि दुकाने यामधील मतदार कर्मचाऱ्यांना ४ तासांची पगारी रजा देण्यात येणार आहे.

या निवडणुकीसाठी एकूण १ हजार ५१ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, राखीव कर्मचाऱ्यांसह सुमारे ६ हजार ९०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानानंतर मतपेट्या सुरक्षितपणे पुण्यातील बालेवाडी येथील स्वीकृती केंद्रावर आणण्यासाठी सुमारे ७५० वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी ही माहिती दिली.

पाच जिल्ह्यांत ४ लाख ५० हजारांहून अधिक पदवीधर मतदार

पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी जिल्हानिहाय मतदान केंद्रे व मतदार संख्या निश्चित करण्यात आली आहे. पदवीधर मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदार, तर शिक्षक मतदारसंघात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी पाच जिल्ह्यांत एकूण ७४१ मतदान केंद्रे असून, ३ लाख ८८ हजार १९ मतदार आहेत. शिक्षक मतदारसंघासाठी ३१० मतदान केंद्रे असून, ६२ हजार मतदार आहेत. दोन्ही मतदारसंघांत मिळून ४ लाख ५० हजार १९ मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतात. जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्यात पदवीधरांसाठी १६० केंद्रे व ८८ हजार २०२ मतदार, तर शिक्षकांसाठी ७२ केंद्रे व १६ हजार ८८२ मतदार आहेत. सोलापूरमध्ये पदवीधरांची ११७ केंद्रे व ४९ हजार ७२२ मतदार, तर शिक्षकांची ७६ केंद्रे व १५ हजार ३०३ मतदार आहेत. साताऱ्यात पदवीधरांची ९३ केंद्रे व ४७ हजार ४६३ मतदार, तर शिक्षकांची ४४ केंद्रे व ९ हजार ४५४ मतदार आहेत. सांगलीत पदवीधरांची १५९ केंद्रे व ८८ हजार ७० मतदार, तर शिक्षकांची ४८ केंद्रे व ८ हजार ६२ मतदार आहेत. कोल्हापूरमध्ये पदवीधरांची २१२ केंद्रे व १ लाख १४ हजार ५६२ मतदार, तर शिक्षकांची ७० केंद्रे व १२ हजार २९९ मतदार आहेत.

जंबो मतपेट्या, साहित्य वाटप आणि वाहतुकीचे नियोजन

पदवीधर मतदारसंघासाठी राखीव मतपेट्यांसह २ हजार १५८, तर शिक्षक मतदारसंघासाठी ७०३ मतपेट्यांची आवश्यकता आहे. या मतपेट्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. मतदानासाठी आवश्यक साहित्याचे जिल्हानिहाय वितरण निश्चित केलेल्या केंद्रांवरून करण्यात येणार आहे.

पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, सोलापूरमधील शासकीय धान्य गोदाम, रामवाडी, साताऱ्यातील डीएमओ गोदाम, एमआयडीसी, सांगलीतील तरुण भारत मैदान आणि कोल्हापूरमधील शासकीय धान्य गोदाम, रमण मळा येथून साहित्य वाटप केले जाणार आहे. त्यानंतर तहसील व उपविभागीय स्तरावरून मतदान पथकांना आवश्यक साहित्य दिले जाईल. मतदान पूर्ण झाल्यानंतर सर्व मतपेट्या पोलिस बंदोबस्तात पुण्यातील बालेवाडी येथील स्वीकृती केंद्रावर आणण्यात येणार आहेत. यासाठी एसटी बस, जीप आणि टेम्पो मिळून सुमारे ७५० वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. मतपेट्यांच्या वाहतुकीदरम्यान सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे.

मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधांची व्यवस्था

मतदारांना मतदान करताना गैरसोय होऊ नये, यासाठी प्रत्येक केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये रॅम्प, पिण्याचे पाणी, वीज, फर्निचर, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, सावली, मदत कक्ष, स्वयंसेवक, रांगेचे व्यवस्थापन, पाळणाघर आणि प्रथमोपचार किट यांचा समावेश आहे.

२७ ऑक्टोबरला मतमोजणी

निवडणूक कार्यक्रमानुसार २३ ऑक्टोबरला मतदान झाल्यानंतर मंगळवार, २७ रोजी मतमोजणी होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

पुणे विभागातील सर्व पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत आपल्या मतदान केंद्रावर जाऊन निर्भयपणे मतदान करावे. पसंतीक्रम नोंदवून वैध मत द्यावे आणि लोकशाहीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांनी केले आहे.

पुणे : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान करता यावे, यासाठी पात्र मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष पगारी रजा देणे खासगी आस्थापना, कंपन्या, मॉल्स, दुकाने व अन्य आस्थापनांना बंधनकारक आहे. या सवलतीच्या कालावधीतील वेतनात कोणतीही कपात करता येणार नाही, असे सहायक कामगार आयुक्त सु. तु. शिर्के यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news