

Monsoon floods Pune villages
पुणे : मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. रविवारी एका दिवसात पुणे जिल्ह्यात २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अनेक गावातील घरांमध्ये पाणी शिरले होते. तसेच काही रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. बारामती तालुक्यातील जाळोची गावामध्ये दुचाकीसह एक जण वाहून गेला होता. अग्निशामक दलाच्या मदतीने सुखरुप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद बारामती तालुक्यात झाली. तब्बल ८३. ६ मिलिमीटर तर इंदापूर तालुक्यात ३५.७ मिलीमीटर पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार सुरू होती. सकाळी सुरू झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी शिरले होते. पुणे सोलापूर महामार्गाला ओढ्याचे स्वरूप आले होते. इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे, निरगुडे, लाकडी, सणसर, चिखली, तावशीसह अनेक गावांच्या घरात पाणी शिरले होते. प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने बाधित झालेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. तसेच काही रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती.
बारामती शहरासह तालुतक्यातील काही गावांमधील घरात पाणी शिरले होते. जाळोची गावामध्ये रिपेरिंगचे काम करण्यासाठी आलेल्या ३१ वर्षीय व्यक्तीला ओढ्याला आलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो दुचाकीसह पाण्यात वाहून गेला होता. त्याला अग्निशामक दलाच्या मदतीने सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. तसेच काटेवाडी येथील एका घरात ७ जण अडकले होते. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
बारामती शहरात १५० घरामध्ये पाणी शिरले आहे. तसेच १९ घरांची पडझड झाली आहे. या नागरिकांसाठी बारामती नगरपरिषदेकडून ८ विविध ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बारामती येथे एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
इंदापूर तालुक्यातील जांब या गावी निरा नदीच्या बांधचे काम करण्यासाठी गेलेले पोकलेन मशीन आणि त्यावरील दोन कामगार नदीच्या प्रवाहात अडकून पडले होते. रात्री उशिरा पर्यंत पोलीस आणि तालुका प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू होते. तसेच तावशी येथे ओढ्याला पाणी आल्याने एका घराला पाण्याच्या वेढा पडला होता. या घरातील कुटुंबीय आणि जनावरांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते.