Pune Crime News : आर्थिक व्यवहारातून ज्येष्ठाचा खून; आरोपी जेरबंद

Pune Crime News : आर्थिक व्यवहारातून ज्येष्ठाचा खून; आरोपी जेरबंद
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आर्थिक व्यवहारासह अन्य कारणावरून 55 वर्षीय ज्येष्ठाच्या खुनाचा कट रचत त्याचा धारदार शस्त्राने खून करणार्‍या तिघांना पुणे पोलिसांनी बारा तासांत गजाआड केले. नुमन जावेद खान (वय 26, रा. किंगस्टन इलेसिया, पिसोळी), साहिल युसूफ शेख (वय 23, रा. बी 1 बंगलो सोसायटी, रा. पिसोळी), सज्जुदीन ऊर्फ सद्दाम सिरखुद्दिन शेख (वय 35, रा. सायमा रेसिडेन्सी, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, शहानवाज ऊर्फ बबलू मुनीर सय्यद (वय 55, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवनेरीनगर येथील पारशी मैदान परिसरात 4 डिसेंबर 2023 रोजी सय्यद याचा मृतदेह आढळून आला होता. पोटात, गळ्यावर धारदार हत्याराने भोसकून वार करून त्यांचा खून करण्यात आला होता. आरोपीचा शोध घेत असताना पिसोळी भागातील एका बंद बिल्डिंगमध्ये एक व्यक्ती रात्रीपासून घाबरलेल्या अवस्थेत थांबला असून त्याने काही गुन्हा केला असल्याची शक्यता गुप्त बातमीदारामार्फत कोंढवा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी धर्मावत पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या बिल्डिंगमध्ये पाहणी केली असता त्यांना एक व्यक्ती टेरेसवर लपून बसल्याचे निदर्शनास आले.

त्याला ताब्यात घेत कोंढवा पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने आपले नाव नुमन खान असल्याचे सांगितले. खान खेरीज या प्रकरणात गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने साहिल शेख व सज्जुदिन शेख यांना बोपदेव घाटातून अटक करत पोलिस ठाण्यात नेत चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान खान याने बँकेकडून घेतलेल्या क्रेडिट कार्डच्या आर्थिक देवाण-घेवाणीवरून सय्यदबरोबर दोन-तीन दिवसांपूर्वी वाद झाला होता.

त्या वेळी सय्यद याने शिवीगाळ केल्याचे सांगितले. तर, साहिल शेख याने दीड वर्षापूर्वी सय्यदकडून पल्सर गाडी विकत घेतली होती. परंतु, तो गाडीची कागदपत्रे न देता वारंवार शिवीगाळ करत असल्याचे सांगितले. तर, सज्जुदीन शेख याने सय्यद याचेकडून दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते. दिलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम देऊनही सय्यद वारंवार दमदाटी करून शिवीगाळ करत पैशांची आणखी मागणी करत असल्याचे सांगितले. सय्यद याच्या त्रासाला कंटाळून तिघांनी संगनमत करत त्याच्या खुनाचा कट रचला. त्यानुसार त्यास 3 डिसेंबर रोजी शिवनेरीनगर येथील पारशी मैदान येथे आणले. मैदानात आल्यानंतर सय्यद यास दारू पाजून त्यानंतर चाकूसारखे धारदार हत्यार पोटात भोसकून गळ्यावर वार करून खून केल्याची कबुली दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news