

Pune Crime Today: एकमेकांकडे पाहताना खुन्नस दिल्याच्या कारणातून झालेल्या वादात दोन तरुणांवर कोयत्याने वार करण्यात आला आहे. त्यामध्ये एका तरुणाच्या हाताचा पंजा तुटला आहे. ही घटना शिवतेज क्रीडा संघ, सुपर इंदिरानगर, बिबवेवाडीत सोमवारी (दि. 6) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली आहे.
पीयूष पाचकुडवे (वय 22) आणि गौरव मरकड (वय 24) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. यातील पीयूष याच्या हाताचा पंजा तुटला आहे. याप्रकरणी सागर सरोज (वय 21) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.
याबाबत गौरव मरकड याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोयत्याच्या हल्ल्यात पीयूष याच्या उजव्या हाताचा पंजा तुटून वेगळा झाला. तसेच, त्याच्या डोक्यावर, पायावर वार करण्यात आले. गौरव याच्या डोक्यावर, डाव्या हाताच्या खांद्यावर आणि दंडावर वार करण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.