

Girls Accused
पुणे : कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण करत जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केल्याप्रकरणात त्यांच्या बाजूने आंदोलन करणाऱ्या वकिलांसह आठ जणांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सागर आल्हाट, स्वप्निल वाघमारे, दत्ता शेंडगे, अॅड. परिक्रमा खोत, श्वेता पाटील, नीती पाटील आणि ऋषिकेश भोलाणे, अॅड. रेखा चौरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) आणि ३७ (३) आणि भारतीय न्यायसंहिता १८९ (२), १९०, २२१, २२३ आणि ३२४ (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक रेखा संभाजी मोरे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या वेळी मुलींच्या समर्थनार्थ आंदोलकांनी पोलिस आयुक्तालयात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. वरिष्ठ अधिकारी तेथे दाखल झाल्यावर आरडाओरडा करत शासकीय पत्र फाडून टाकण्यात आले होते. या आंदोलनात आमदार रोहित पवार, वंचित आघाडीचे नेते सुजात आंबेडकर हे देखील रात्रभर उपस्थित होते. दि. 3 ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनामध्ये आंदोलकांनी "आम्ही आत गेल्याशिवाय थांबणार नाही" असे म्हणत पोलिस आयुक्तालयाचे गेट क्रमांक २ जबरदस्तीने उघडून प्रांगणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी घोषणाबाजी करत बसून आंदोलन सुरू केले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सहायक पोलिस आयुक्त, अपर पोलिस आयुक्त तसेच पोलिस उप-आयुक्तांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी आरडाओरडा सुरूच ठेवला. त्यावेळी दिलेले अधिकृत शासकीय पत्र श्वेता पाटील यांनी फाडल्याची माहिती समोर आली. त्यानुसार आता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भडकाऊ संदेश पसरवल्यानेही गुन्हा : आंदोलनकर्त्यांनी 'आम्ही गुन्हा दाखल झाल्याशिवाय उठणार नाही,' 'मालकाने मालकासारखे राहावे आणि नोकराने नोकरासारखे' अशा भडकाऊ घोषणा देत पोलिस प्रशासनासमोर अडथळा निर्माण केला. आंदोलनादरम्यान फेसबुक लाईव्हद्वारे भडकाऊ संदेश प्रसारित करून समाजात संभ्रम निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.