

पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनातील प्रमुख आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद कोमकर याचा शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास गोळ्या झाडून खून करण्यात आला. नाना पेठेतील नवरंग वाडा परिसरात ही घटना घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोविंद हा त्याच्या घराखाली थांबला होता. त्यावेळी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. तीन गोळ्या झाडल्याचा माहिती आहे. उपचारासाठी गोविंद याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. गोविंद याच्या खुनामुळे पुण्यात परत एकदा टोळी युद्धाचा भडका उडाल्याचे दिसून येते आहे.
एक वर्षापूर्वी वनराज आंदेकर यांचा १ सप्टेंबर रोजी पूर्ववैमनस्य आणि वर्चस्वाच्या वादातून खून करण्यात आला होता. त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न आंदेकर टोळीकडून केला जात होता. यातील काही आरोपीच्या आंबेगाव पठार येथील घराची आंदेकर टोळीने रेकी केली होती.त्यात आंदेकर टोळीतील काळे याला पोलिसांनी नुकतेच पकडले होते. त्यातच आता नानापेठेत गोविंद याचा खून करण्यात आला आहे. वनराज आंदेकर याचा खुन करणारे २३ गुन्हेगार एक वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत़ त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे़