

पुणे : गृहोद्योगासाठी कच्चा माल पुरविण्याच्या आमिषाने ९० महिलांची दोन लाख 70 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीतील एका दाम्पत्याविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुनील नारायण शिराळकर, सविता सुनील शिराळकर (दोघे रा. एकदंत अपार्टमेंट, बारामती, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रागिणी सुधीर धोंगडे (वय 43, रा. आळे, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिराळकर दाम्पत्याने 'महिला उद्योगवर्धिनी' या संस्थेच्या वतीने टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात बैठक घेतली होती. गृहिणींना उद्योगासाठी मदत तसेच कच्च्या मालाचा पुरवठा करण्यात येईल, असे त्यांनी बैठकीदरम्यान सांगितले होते. राखी, जपमाळ तयार करण्यासाठी कच्चा माल पुरविण्याचे सांगून शिराळकर दाम्पत्याने महिलांकडून दोन लाख 70 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर शिराळकर दाम्पत्याने त्यांना गृहोद्योग सुरू करण्यासाठी कच्चा माल पुरविला नाही, असे धोंगडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच धोंगडे यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिराळकर दाम्पत्याने ऐंशी ते नव्वद महिलांकडून पैसे घेतल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात समोर आल्याचे पोलिस उपनिरीक्षक शिरसाट यांनी सांगितले.