

महेंद्र कांबळे
पुणे : वारीच्या मार्गावर "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी चालले होते. वाहतुकीचे नियोजन करण्यात पुणे पोलिसांची धावपळ सुरू होती. त्याचवेळी अचानक एक वारकरी रस्त्यावर कोसळला. काही क्षणांसाठी परिसरात एकच गोंधळ उडाला. लोक मदतीसाठी धावू लागले; मात्र त्याआधीच खाकी वर्दीतील एक अधिकारी त्या वारकऱ्याजवळ पोहोचला. तो अधिकारी होता पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रस्त्यावरच प्राथमिक उपचार सुरू केले आणि वारकऱ्याला दिलासा दिला.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, "पोलिसांची वारी केवळ बंदोबस्ताची नाही, तर सेवेचीही आहे," अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत. डॉ. भाजीभाकरे हे वैद्यकीय शिक्षण घेतलेले अधिकारी आहेत. त्यामुळे वारकऱ्याला फिट आल्याचे लक्षात येताच त्यांनी वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करत तातडीने योग्य पद्धतीने प्राथमिक उपचार केले. काही वेळातच वारकऱ्याची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी वैद्यकीय पथकाकडे सोपविण्यात आले.
मानवतेची ही भावना डॉ. भाजीभाकरे यांच्यासाठी नवी नाही. काही महिन्यांपूर्वी वानवडी परिसरात एका वृद्ध महिलेला अचानक फिट आल्याने ती रस्त्यावर कोसळली होती. त्या वेळीही त्यांनी प्रसंगावधान राखत स्वतः प्राथमिक उपचार करून तिचा जीव वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांची ओळख केवळ पोलिस अधिकारी म्हणून नव्हे, तर संकटसमयी धावून जाणारा संवेदनशील "डॉक्टर डीसीपी" अशी निर्माण झाली आहे.
वारीत पोलिसांचे काम केवळ वाहतूक सुरळीत ठेवणे किंवा सुरक्षा देणे एवढ्यावर मर्यादित नसते. भाविकांची सुरक्षितता, आरोग्य आणि गरज पडल्यास त्यांच्या मदतीला धावून जाणे, हेही तेवढेच महत्त्वाचे असते. डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या कृतीतून याच संवेदनशील पोलिसिंगचे दर्शन घडले. लाखो वारकऱ्यांच्या सेवेत उभ्या असलेल्या पुणे पोलिस दलाचा मानवी चेहरा या एका घटनेतून पुन्हा एकदा समोर आला. वारीत विठ्ठलभक्तांच्या सेवेसाठी झटणाऱ्या या पोलिस अधिकाऱ्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत असून, "खाकीतील देवदूत", "सलाम पुणे पोलीस" आणि "सेवाच खरी भक्ती" अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत.