कडूस : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विशेषतः भीमाशंकर अभयारण्य परिसरात संततधार पाऊस पडत असल्याने ८.५३ टिएमसी क्षमता असलेले चासकमान धरण ८०.६६ टक्के भरले आहे. खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून चासकमान धरणाचे पाचही दरवाजे ३० सेंटिमिटरने गुरुवारी (दि.२५) रात्री पावणे बारा वाजता उघडून सांडव्याद्वारे एकूण ४ हजार ५४५ क्युसेक वेगाने भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चासकमान धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी एकूण ५५३ मिलिमिटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली असून मागील २४ तासांत ६६ मिलिमिटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. भीमा व आरळा नदीद्वारे चासकमान धरणात सुमारे १७ हजार क्यूसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे. चासकमान धरणासह कळमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने धुवाधार हजेरी लावल्यामुळे धरणाच्या वरील बाजूस असलेल्या आरळा नदी बरोबरच भीमा नदीने रौद्र रुप धारण केले असल्याने नद्यांचे पात्र दुथडी भरून वाहू लागल्यामुळे नद्यामधील सर्व पाणी चासकमान धरणामध्ये येत असल्याने धरणामधील पाण्याचा विसर्ग कमी जास्त प्रमाणात करण्यात येत आहे.