उद्यापासून पुन्हा...आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.....; दुपारच्या स्थानिक प्रसारणाला मंजुरी

प्रसार भारतीने दिली दुपारच्या स्थानिक प्रसारणाला मंजुरी : दोन वर्षांपासून होते बंद
All India Radio
आकाशवाणीPudhari
Published on
Updated on

गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले आकाशवाणी पुणे केंद्राचे दुपारचे स्थानिक प्रसारण आता रविवारपासून(दि. 6) पुन्हा सुरू होणार आहे. प्रसार भारतीकडून याला मंजुरी देण्यात आली आहे. सायंकाळचे स्थानिक प्रसारण सुरू झाल्यानंतर पुणे केंद्राचे दुपारचे स्थानिक प्रसारण पूर्ववत सुरू व्हावे, अशी मागणी श्रोते, कलाकार करत होते, या निर्णयामुळे श्रोत्यांनी आनंद व्यक्त केला.

या निर्णयाला आकाशवाणीच्या श्रोत्यांनी आणि स्थानिक कलाकारांनी विरोध केला होता. पुणे केंद्रातील अधिकार्‍यांकडूनही स्थानिक श्रोते आणि कलाकारांच्या भावना वेळोवेळी वरिष्ठांना कळविल्या जात होत्या. अखेर या प्रयत्नांना यश मिळून एप्रिल महिन्यापासून आकाशवाणी पुणेचे सायंकाळचे प्रसारण पूर्ववत करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आणि सायंकाळचे स्थानिक प्रसारण सुरू झाले. पण, दुपारचे स्थानिक प्रसारणाला मंजुरी मिळाली नव्हती. हे प्रसारणही सुरू करण्यात यावे, अशी सातत्याने मागणी केली जात होती. अखेर रविवार (दि. 6) पासून दुपारचेही स्थानिक प्रसारण सुरू होत आहे. याविषयी आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक इंद्रजित बागल म्हणाले, वरिष्ठ पातळीवरील आदेशानुसार दोन वर्षापूर्वी दुपारचे स्थानिक प्रसारण बंद होऊन आकाशवाणी मुंबईचे प्रसारण पुण्याहून सहक्षेपित केले जात होते.

सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा तिन्ही प्रसारणांची निर्मिती आता पुणे केंद्रातून स्थानिक पातळीवर होणार आहे. दुपारचे स्थानिक प्रसारण सुरू झाल्यामुळे आता वनिता मंडळ, सखी संदेश, भावधारा आदी कार्यक्रम पुन्हा सुरू होतील. 1953 सालापासून आकाशवाणीचे पुणे केंद्र कार्यरत आहे. प्रसार भारतीच्या अधिकृत आकडेवारीनुसार, पुणे हे देशातील आकाशवाणीचे सर्वाधिक श्रोते असलेले शहर आहे. असे असूनही प्रसार भारतीच्या धोरणात्मक निर्णयामुळे दोन वर्षांपूर्वी पुण्यासह महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांची दुपारची आणि सायंकाळची स्थानिक प्रसारण निर्मिती बंद करून त्याऐवजी त्यांना मुंबई केंद्र सहक्षेपित करण्याचे आदेश देण्यात आले होते.

आम्ही दुपारचे प्रसारण पुन्हा स्थानिक पातळीवरून करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवला होता आणि त्याचा पाठपुरावा करत होतो, त्यानुसार वरिष्ठांनी दुपारचे स्थानिक प्रसारण पुन्हा पूर्ववत करण्यासाठी मंजुरी दिली असून, रविवारपासून दुपारचे स्थानिक प्रसारण पुन्हा सुरू केले जाईल.

प्रसार भारतीकडे होताहेत श्रोत्यांकडून या प्रमुख मागण्या

  • आकाशवाणी पुणे केंद्र सध्या मध्यम लहरीवर (मीडियम वेव्ह) उपलब्ध आहे. ही जुनी टेक्नॉलॉजी असल्याने ती कालबाह्य झाली आहे. त्यामुळे पुणे केंद्र एफ.एम.वर उपलब्ध करून द्यावे, यासाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

  • देशातील 25 शहरात आकाशवाणीचे एफ. एम. रेनबो चॅनेल आहे, पुणे केंद्रातही हे रेनबो चॅनेल सुरू करण्यात यावे, ही मागणीही श्रोते करत आहेत.

  • मराठी भाषेवर आधारित आकाशवाणी मराठी असे नवे चॅनेल सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. आता मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आता याला मंजुरी द्यावी, ही मागणीही होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news