चांगली बातमी ! पुणे विमानतळाला मिळणार संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव

Pune नाव देण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून हालचाली
Pune International Airport is named after Tukaram Maharaj
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव
Published on
Updated on

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यासाठी, राज्य शासनाने तसा प्रस्ताव तयार करुन केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी भूमिका पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आहे. यासंदर्भातील हालचालींना वेग आला असून नावासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, यासाठी मोहोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

विमानतळाचे नामकरण करतानाचा नावाचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे येत असतो आणि त्यानंतर नामांतरावर शिक्कामोर्तब होते. म्हणूनच पुण्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने राज्य सरकारकडे ही भूमिका मांडली आहे, असे मोहोळ यांनी सांगितले. ‘आपल्या भूमिकेवर राज्य सरकारही सकारात्मक असून लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारकडे आपण याचा पाठपुरावा करणार आहोत, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

‘पुण्याचे विमानतळ असलेल्या लोहगावमध्ये जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचं आजोळ होते. त्यामुळे लोहगाव आणि तुकाराम महाराजांचे नाते जिव्हाळ्याचे होते. शिवाय लोहगावच्या गावकऱ्यांचीही माझ्याच भूमिकेप्रमाणे इच्छा असून महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाचीही संवेदना या विषयाशी जोडलेली आहे. त्यामुळे लोहगावच्या विमानतळाला तुकोबारायांचे नाव देणे, हे अधिक समर्पक असणार आहे’, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

मोहोळ यांच्या भूमिकेचे समाजमाध्यमांमधून स्वागत

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी घेतलेल्या भूमिकेचे लोहगावातील ग्रामस्थांसह समाजमाध्यमातून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. पुणे विमानतळाला तुकाराम महाराजांचे नावे देणे, अधिक समर्पक असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. या भूमिकेसंदर्भात मोहोळ यांनी समाज माध्यमांमध्ये केलेल्या पोस्टवर समर्थनार्थ भूमिकेचा अक्षरशः पाऊस पडला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news