
Pune Airport
पुणे : लोहगाव पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर सोमवारी (दि.२८) सायंकाळी सातच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे विमानतळ अधिकारी, सुरक्षा कर्मचारी यांच्यासह नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहचली असून बिबट्याचा शोध सुरू असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.
लोहगाव विमानतळाच्या मुख्य रन वे जवळ असलेल्या रनवेच्या जवळ बिबट्याचे प्रथम दर्शन झाले. याबाबत तात्काळ विमानतळाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनी माहिती कळवली. सुरुवातीला वन विभागाला जंगली मांजर असल्याचा कॉल करण्यात आला. वनविभागाकडून तात्काळ एक टीम घटनास्थळी पाठवून देण्यात आली आहे. या घटनेने लोहगाव विमानतळावरील अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोहगावमधील परिसरातही घबराहट पसरली आहे. याबाबत बोलताना वन विभागाचे वन अधिकारी सुरेश वरद म्हणाले, वन विभागाला बिबट्या आढळून आल्याची माहिती मिळताच एक टीम घटनास्थळी रवाना केली आहे. बिबट्याचा शोध सुरू असून लवकरच बिबट्याला रेस्क्यू करण्यात यश येईल.