Pune Airport | बँकॉकहून आलेल्या महिलेकडून १.१४ कोटींचे हायड्रोपोनिक गांजा जप्त!

पुणे विमानतळावर कस्टम्सची कारवाई; ट्रॉली बॅगेत तयार केलेल्या चोरकप्प्यांतून ३.२५५ किलो अमली पदार्थ हस्तगत
Pune Airport | बँकॉकहून आलेल्या महिलेकडून १.१४ कोटींचे हायड्रोपोनिक गांजा जप्त!
Published on: 
Updated on: 

पुणे : बँकॉकहून पुण्यात आलेल्या भारतीय महिला प्रवाशाकडून तब्बल १ कोटी १४ लाख रुपये किमतीचा ३ किलो २५५ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात पुणे कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स डिपार्टमेंट यश आले. ट्रॉली बॅगेच्या आतील अस्तरामागे खास चोरकप्पे तयार करून त्यामध्ये तीन थरांच्या व्हॅक्यूम सीलबंद पाकिटात हा अमली पदार्थ लपविण्यात आला होता. गुरुवारी (दि. ५) सायंकाळी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी संबंधित महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

कस्टम्स विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँकॉकहून एअर इंडिया एक्स्प्रेसच्य आय एक्स-291 या विमानाने महिला पुणे विमानतळावर दाखल झाली होती. तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने हवाई बुद्धिमत्ता घटक (एआययू) आणि विमानतळ तुकडीच्या अधिकाऱ्यांनी तिच्यावर लक्ष केंद्रित केले. तिच्या चेक-इन ट्रॉली बॅगेच्या स्कॅनिंगमध्ये संशयास्पद बाबी आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी बॅगेची सखोल तपासणी केली.

यावेळी बॅगेच्या दोन्ही बाजूंच्या आतील अस्तरामागे विशेष पद्धतीने चोरकप्पे तयार केल्याचे उघड झाले. या कप्प्यांमध्ये तीन थरांच्या व्हॅक्यूम सीलबंद काळ्या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली दोन आयताकृती पाकिटे आढळली. त्यामध्ये नारंगी-हिरव्या रंगाचा, तीव्र दर्प असलेला वाळलेला चूरा होता. चाचणी मशीनद्वारे तपासणी केली असता, हा पदार्थ उच्च प्रतीचा हायड्रोपोनिक गांजा असल्याचे स्पष्ट झाले.

कस्टम्स अधिकाऱ्यांनी ३ किलो २५५ ग्रॅम वजनाचा हा अमली पदार्थ जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे १ कोटी १४ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत हा मुद्देमाल जप्त करून महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. या तस्करीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच हा अमली पदार्थ कोणासाठी आणण्यात आला होता, याचा तपास पुणे कस्टम्सकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.