

पुणे : बँकॉकहून पुण्यात आलेल्या प्रवाशाच्या बॅगेत लपवून आणलेला ४४ लाख २७ हजार रुपये किमतीचा १ किलो २६५ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने जप्त केला. बॅगेच्या अस्तरात बनावट कप्पे तयार करून अमली पदार्थ लपविण्यात आले होते. १९ ऑक्टोबर रोजी केलेल्या या कारवाईत संबंधित भारतीय प्रवाशाला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केली. बँकॉकहून एअर इंडिया एक्स्प्रेसच्या ‘आयएक्स-२४१’ या विमानाने आलेल्या प्रवाशाची प्रगत प्रवासी प्रोफाइलिंग आणि चेक-इन बॅगेची क्ष-किरण तपासणी करताना अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानंतर त्याच्या सामानाची कसून झडती घेण्यात आली.
बॅगेच्या अस्तरात लपविला साठा
प्रवाशाच्या काळ्या रंगाच्या ट्रॉली बॅगेच्या बाजूंच्या अस्तरात बनावट कप्पे तयार करण्यात आले होते. त्यामध्ये हवाबंद, बहुस्तरीय प्लास्टिकच्या दोन पाकिटांत अंमली पदार्थ लपवून ठेवण्यात आले होते. पाकिटांमध्ये पिवळसर-हिरव्या रंगाचा वाळलेला वनस्पतीजन्य पदार्थ आढळला. प्राथमिक क्षेत्रीय चाचणीत तो हायड्रोपोनिक गांजा असल्याचे स्पष्ट झाले.
सीमाशुल्क विभागाने एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत हा संपूर्ण साठा जप्त केला. परदेशातून पुण्यात अंमली पदार्थ आणण्यामागे मोठे तस्करीचे जाळे आहे का, याचा तपास आता सुरू आहे. या तस्करीचे मागील आणि पुढील दुवे शोधण्यावर अधिकाऱ्यांचा भर असून, या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा छडा लावला जात आहे. पुणे कस्टम विभागाचे आयुक्त डी. अनिल, उपायुक्त धीरज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.