

पुणे : पुण्यातील हवा पूर्वी सारखी शुद्ध राहिली नसून ९० दिवसात पुणेकर चक्क ६० टक्के पेक्षा जास्त प्रदूषित हवा शरीरात घेत असल्याचा धक्कादायक अहवाल सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (सीईआरए) या संस्थेने दिला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदींच्या आधारे हा निष्कर्ष दिल्याचा दावा केला आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदींच्या विश्लेषणानुसार, फेब्रुवारी ते एप्रिल २०२५ पर्यंत, पुण्यातील नागरिकांनी ८९ दिवसांपैकी ५७ दिवस दूषित हवा श्वासनाद्वारे शरीरात घेतली. खरं तर, संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात, पुणेकरांनी दूषित हवा श्वासनाद्वारे शरीरात घेतली आहे. ज्यामध्ये महिन्याकाठी सरासरी पी एम-१० (सूक्ष्म धूलिकण) चे प्रमाण सरासरी १२७ मायक्रो ग्राम प्रती क्यूबिक मीटर होती. तर मार्च महिन्यात हे प्रमाण ११२ इतके होते.
राष्ट्रीय वातावरणीय हवा गुणवत्ता मानके (एनएएक्यूएस ) अंतर्गत पीएम १० या चे प्रमाण १०० पर्यंत मनुष्य सहन करू शकतो. पीएम १० च्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने श्वसनाचे आजार, हृदय, रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचा धोका वाढतो. पुण्यातील हवेची गुणवत्ता एप्रिल २०२४ च्या तुलनेत २०२५ च्या एप्रिलमध्ये जास्त प्रदुषित आढळून आली आहे. पीएम २.५ (अतिसूक्ष्म धूलिकण) पातळी शहरात धोक्याची रेषा गाठत असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. पीएम २.५ च्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने हृदयरोग, फुफ्फुसांचे कार्य कमी होत फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
हिवाळा सुरू होण्यापूर्वी आणि हवेची गुणवत्ता खराब होण्यापूर्वी, पुण्याला अजूनही त्याची मूलभूत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कृतींना प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी प्रभावी उपाययोजना करायला हवे.
पुण्यात मेट्रो , पीएमपीएमएल या दोन्ही सेवा असल्याने नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निग्रहाने वापरण्याची वेळ आली आहे.
नागरिकांसाठी खाजगी वाहनांपासून सार्वजनिक वाहतुकीकडे गेले पाहिजे.
उघड्यावर कचरा जाळण्यावरील बंदीची अंमलबजावणी मजबूत करायला हवी.