Pune Accident: कामाच्या शोधात घर सोडले, पण परतला पार्थिव; वाडीतील तरुणाचा पुण्यात अपघाती मृत्यू

वाडी परिसरात हळहळ व्यक्त
Pune Accident: कामाच्या शोधात घर सोडले, पण परतला पार्थिव; वाडीतील तरुणाचा पुण्यात अपघाती मृत्यू
Published on
Updated on

वरठाण : सोयगाव तालुक्यातील वाडी येथील १८ वर्षीय तरुणाचा पुण्यात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान रविवारी (दि. २१) रात्री मृत्यू झाला. या घटनेमुळे वाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वाडी परिसरात यंदा पाऊस न पडल्याने शेतीची कामे ठप्प झाली असून मजूर वर्गासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने नागेश राहुल निकम (वय १८, रा. वाडी, ता. सोयगाव) हा रोजगाराच्या शोधात बुधवारी (दि. १७) पाचोरा येथून रात्री पुण्यासाठी रवाना झाला.

पुण्यात गुरुवारी पहाटे सुमारे ३ वाजता तो उरळी कांचन रेल्वे स्थानकावर उतरला. तेथून मित्राच्या घरी जाण्यासाठी रिक्षाने लोणी टोल नाक्याजवळ आल्यानंतर रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. अपघातानंतर नागेश गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता. स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.

चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रविवारी (दि. २१) रात्री उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सोमवारी (दि. २२) सकाळी ११ वाजता वाडी येथे नागेशच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news