

पुणे : भरधाव वेगातील रिक्षा पलटून झालेल्या अपघातात ज्येष्ठ प्रवासी महिलेचा मृत्यू झाला. शोभना लक्ष्मण मोहिते (वय 78, रा. जाधवनगर, येरवडा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी मुलगा सतीश लक्ष्मण मोहिते (वय 56) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रिक्षाचालक पीतांबर लोटन देसले (रा. मुंजाबावस्ती, धानोरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 11 सप्टेंबर रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास पोस्ट ऑफिस चौक (नागपूर चाळ, येरवडा) परिसरात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींच्या आई शोभना ह्या पीतांबर याच्या रिक्षातून प्रवास करीत होत्या. पितांबरने रिक्षा भरधाव वेगात चालविल्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले. यामुळे रिक्षा पलटी झाली. त्यामध्ये शोभना गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शोभना यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रिक्षाचालक पीतांबर देसले याच्याविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे