

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : वेल्हे येथे सोमवारी (दि. ६) दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास एका तरुणावर अज्ञातांनी पिस्तूलने बेछुट गोळीबार व सत्तुराने वार करून निघृण खून केल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पप्पूशेठ उर्फ नवनाथ नामदेव रेणुसे (वय ३८, रा. पाबे, ता. वेल्हे) असे मृत तरुणाचे नाव आहे. काही अज्ञातांनी नवनाथ याला विसावा हॉटेलमध्ये बोलावून घेतले. हॉटेलमध्ये येताच नवनाथ यांच्यावर बेछुट गोळीबार झाला. त्यातील काही गोळ्या नवनाथ याने हुकवल्या; मात्र दोन गोळ्या डोक्यात व छातीत शिरल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी सत्तुराने त्याच्या तोंडावर, शरिरावर जोरदार वार केले. काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवनाथ यांचा जागीच मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. अद्याप हत्येचे कारण समजले नाही मात्र काही हल्लेखोरांची माहिती पोलिसांना मिळाली.
हल्लेखोर तोंडाला रूमाल बांधुन आले होते. पाच हल्लेखोर दोन मोटरसायकलवरून पसार झाले. माहिती मिळताच वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.