

पुणे: ‘दै पुढारी’ माध्यम समूहाच्या राईज अप जलतरण स्पर्धेच्या तिसर्या सिझनला उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेच्या तिसर्या सिझनचे उद्घाटन राष्ट्रीय जलतरणपटू आणि भारतीय महिला जलतरण संघाच्या प्रशिक्षक कल्पना आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय जलतरणपटू अनुराधा गाडगीळ, पुणे जिल्हा अॅम्युचर अॅक्वेटिक जलतरण असोसिएशनच्या सदस्या आणि स्पर्धा समनव्यक माधुरी चव्हाण उपस्थित होत्या.
मानाचे मेडल, आकर्षक ट्रॉफी मिळवण्यासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड,पुणे जिल्हयातील मुली,महिला या नेहमीच उत्सुक असतात....अशी महत्वाकांक्षा असणार्या मुलींसाठी पुण्याच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रीडाविश्वात फक्त दोन वर्षांच्या कालावधीत प्रसिध्द झालेला फक्त महिलांसाठी असलेला पुढारी राईज अप जलतरण स्पर्धेचा तिसरा सीझन डेक्कन जिमखाना येथील टिळक जलतरण तलावावर उत्साहात सुरुवात झाली.
पुणे जिल्ह्यातील जलतरण प्रेमी, मुली, पालक, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते ती स्पर्धा पुणे डिस्ट्रिक्ट अमॅच्युअर अॅक्वेटिक असोसिएशनच्या सहकार्याने 7 वर्षे, 9 वर्षे, 11 वर्षे, 13 वर्षे, 15 वर्षे, 17 वर्षे, 30 वर्षापेक्षा अधिक अशा सात वयोगटांमध्ये होणार आहे. या स्पर्धेत एकूण वैयक्तिक 47 प्रकारच्या स्पर्धा पार पडणार आहे.
विशेष बाब म्हणजे या स्पर्धेसाठी विनामूल्य प्रवेश असून आत्तापर्यंत या स्पर्धेसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्ह्यातील स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेमधील यशस्वी स्पर्धकांना मेडल्स, ट्रॉफीज अशी भरघोस बक्षीसे आहेतच पण याशिवाय सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देखील मिळणार आहे. या स्पर्धेसाठी टायटल स्पॉन्सर माणिकचंद ऑक्सीरीच, स्किन केअर पार्टनर रुपमंत्रा तर फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप् क्रेडिट सोसायटी, सपोर्तींग पार्टनर म्हणून पुणे महानगरपालिका यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले आहे.
‘दै पुढारी’ आयोजित या स्पर्धेत मुलींचा खूप उत्साह दिसून येतोय. अशा प्रकारची स्पर्धा घेणारी ही एकमेव माध्यम समूह संस्था आहे. केवळ मुली आणि महिलांसाठीच ही स्पर्धा असल्याने मोठे आणि खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिल्या बद्दल एक राष्ट्रीय महिला खेळाडू म्हणून पुढारी संस्थेचे आभारी आहोत. आगामी काळात अशी चांगली उपक्रम संस्थेच्या माध्यमातून होतील अशी आशा आहे.
- कल्पना आगाशे (राष्ट्रीय जलतरणपटु आणि भारतीय महिला जलतरण संघाच्या प्रशिक्षक)
‘दै पुढारी’ या संस्थेच्या वतीने केवळ महिलांसाठी ही स्पर्धा भरवल्याने आनंद झाला आहे. या स्पर्धेत सहभागी खेळाडूला कोणतीही प्रवेश फी न घेता मोफत प्रवेश दिला आहे. त्याचबरोबर प्रत्येक विजेत्या खेळाडूला आकर्षक पारितोषिक देत असून सहभागी खेळाडूंचा ही सन्मान करीत आहेत. ही खुप आनंदाची बाब असून या स्पर्धा जिल्ह्या पुरता मर्यादित न राहता या स्पर्धेची व्याप्ती वाढली पाहिजे.
- अनुराधा गाडगीळ (राष्ट्रीय जलतरणपटू)
‘दै पुढारी’ आयोजित या स्पर्धेचे वैशिष्ट्ये म्हणजे केवळ महिला आणि मुलींसाठी या स्पर्धेचे उत्तम आयोजन केले जाते. अशा स्पर्धेचे नियोजन करताना उत्तम सहकार्य पुढारी देत असते. तसेच या स्पर्धेत खेळाडूंचा योग्य सन्मान ही केला जातो ही महत्त्वाची बाब आहे.
- माधुरी चव्हाण (स्पर्धा सन्मवयक आणि सदस्य, पुणे जिल्हा अॅम्युचर अॅक्वेटिक जलतरण असोसिएशन)