पुणे: श्री रामजन्माच्या गीताचं ध्वनिमुद्रण उद्या करायचं, म्हणून संध्याकाळी पंचवटी बंगल्याच्या मागच्या अंगणात ग. दि. माडगूळकर मांडी ठोकून गीत लिहायला बसले. पण, संध्याकाळ मावळली, रात्र चढू लागली, तरी गीत कागदावर उमटेना. अक्षरश: दुसर्या दिवशीची पहाट आली तसं घरातून गदिमापत्नी विद्याताईंनी विचारलं ‘काय झालं?’ त्यावर गदिमा उद्गारले ‘अग घाई काय करतेस? श्री रामजन्माला यायचाय. तो काही अण्णा माडगूळकर नव्हे.
त्यामुळं वेळ लागणारच...’ अन् अखेरीस पहाटेच्या झुळकीसरशी ते सुंदर गीत जन्मलं... ‘चैत्रमास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती, दोन प्रहरी का ग शिरी सूर्य थांबला..., राम जन्मला ग सखी राम जन्मला...’ गीतरामायण प्रत्यक्ष साकारताना अशा अनेक घटना घडल्या आहेत की ज्या ऐकाव्याशा वाटतात.
अशाच रंजक घटना, किश्यांची रेलचेल असणारा ‘असे साकारले गीतरामायण’ हा कार्यक्रम आपल्यासमोर येतोय. पुढारी माध्यमसमूह आयोजित आणि भारती विद्यापीठ प्रायोजित अशा या कार्यक्रमाचे बँकिंग पार्टनर आहेत पुणे पीपल्स बँक, तर प्रेझेंटिंग पार्टनर कोहिनूर ग्रुप हे आहेत. तसेच हेल्थ पार्टनर आहेत प्रोफाईल कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट. हा अनोखा कार्यक्रम होणार आहे येत्या 8 एप्रिलला.
गीतरामायणाची रचना झाली, त्याला संगीत दिले गेले, त्याचे ध्वनिमुद्रण झाले आणि आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून त्याचे प्रथम प्रसारण झाले, त्या प्रत्येक टप्प्यात अनेक रंजक घटना घडल्या. अक्षरश: दंतकथा शोभतील, ऐकणार्याला नवल वाटेल असे प्रसंग या काळात घडले. रसिकांना हे प्रसंगही ऐकण्याची अनोखी संधी ‘असे साकारले गीतरामायण’ या कार्यक्रमात मिळणार आहे.
गीतरामायण रचले ते ‘महाराष्ट्राचे वाल्मीकी’ अशी पदवी जनमानसाने दिलेले ग. दि. माडगूळकर यांनी आणि त्याला संगीत दिले ते स्वरतीर्थ सुधीर फडके ऊर्फ बाबुजी यांनी. गीतरामायणाच्या निर्मिती आणि सादरीकरणाच्या दरम्यान घडलेल्या प्रसंगांना उजाळा देणार आहेत ते गदिमापुत्र आनंद माडगूळकर आणि बाबुजीपुत्र श्रीधर फडके. हे ऐकावेसे वाटणारे प्रसंग सांगत असताना हे दोघेही गीतरामायणाचे गायनही करणार आहेत.
‘असे साकारले गीतरामायण’ या कार्यक्रमाला मुक्त प्रवेश असून, त्याच्या मोफत प्रवेशिका मित्रमंडळ चौकाजवळील ‘पुढारी’ कार्यालय तसेच टिळक रस्त्यावरील ग्राहकपेठ येथे मिळू शकतील. या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाला पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रम कोणता?
आनंद माडगूळकर आणि श्रीधर फडके यांनी आपल्या सहकार्यांसह सादर केलेला ‘असे साकारले गीतरामायण’
कुठे आणि कधी?
सातारा रस्त्यावरील बिबवेवाडी येथील अण्णा भाऊ साठे प्रेक्षागृहात येत्या मंगळवारी 8 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता.
मोफत प्रवेशिका कुठे मिळणार?
1) सारसबाग ते मित्रमंडळ चौकादरम्यान असलेल्या दै. ‘पुढारी’च्या कार्यालयात सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत.
2) टिळक रस्त्यावरील ग्राहकपेठेत सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत.
‘महाराष्ट्राचे वाल्मीकी’ ग. दि. माडगूळकर आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांनी निर्माण केलेल्या गीतरामायणाचे गारूड गेली 70 वर्षे समाजमनावर कायम आहे. पाच पिढ्यांच्या वर या गीतरामायणाने संस्कार केला आहे. भारती विद्यापीठाने गेली 60 वर्षे दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच नेहमीच कला, साहित्य आणि संस्कृतीविषयक उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे. या उपक्रमात सहभागी होताना आनंद होत आहे.
- डॉ. विवेक सावजी, कुलगुरू, भारती विद्यापीठ अभिमत विश्व विद्यालय, पुणे