दै. ‘पुढारी’च्या वतीने आयोजित केलेल्या राईज अप महिला अॅथलेटिक्स सीझन-3 च्या स्पर्धांना कडाक्याच्या थंडीत मंगळवारपासून सुरुवात झाली असून, पुणे शहरासह पिंपरी- चिंचवड आणि जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.
पुणे जिल्ह्यातील अॅथलेटिक्सप्रेमी, मुली, पालक, क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षक आतुरतेने वाट पाहत असलेल्या या राईज अप महिलांच्या अॅथलेटिक्स स्पर्धेला कै. बाबूराव सणस मैदानावर दणदणीत सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ राष्ट्रीय अॅथलेटिक्स प्रशिक्षक बाप्टिस्ट डिसूझा यांच्या हस्ते करण्यात आले. सहभागी सर्व स्पर्धकांनी व क्रीडा शिक्षकांनी प्रमुख पाहुण्यांना लाँग मार्चद्वारे सलामी दिली.
तसेच, या स्पर्धेचे उद्घाटन चिमुकल्या स्पर्धकांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून करण्यात आले. या स्पर्धेला जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे आणि पुणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष
अॅड. अभय छाजेड हे मान्यवर आवर्जून उपस्थित होते. स्पर्धकांच्या विशेष म्हणजे लहान मुलींच्या चेहर्यावरील आनंद सर्वांना भारावणारा होता. पालक आणि क्रीडा प्रशिक्षक हे अतिशय उत्साहित होते. जिल्हाधिकारी डॉ. प्रियांक जावळे यांनी खेळाडूंसाठी रुग्णवाहिका (108) उपलब्ध करून दिली.
पुणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने 9 वर्षे, 11 वर्षे, 13 वर्षे, 15 वर्षे, 17 वर्षे अशा पाच वयोगटांमध्ये तब्बल 2250 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, अडथळा शर्यत, अशा वैयक्तिक एकूण 33 प्रकारांत; तर 4 सांघिक रिले स्पर्धा होणार आहेत.
या स्पर्धेसाठी टायटल स्पॉन्सर माणिकचंद ऑक्सिरीच, स्किन केअर पार्टनर रूपमंत्रा स्किन, तर फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. क्रेडिट सोसायटी, सपोर्टिंग पार्टनर म्हणून पुणे महानगपालिका यांचे सहकार्य लाभले आहे. विशेष म्हणजे, गिफ्ट पार्टनर तन्वी हर्बल यांच्या सहकार्याने या स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना विशेष गिफ्ट दिले जाणार आहेत.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटना, पुणे गर्ल्स असोसिएशन, पुणे जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना, पुणे महानगरपालिका क्रीडा विभाग, पिंपरी-चिंचवड क्रीडा शिक्षक संघटना यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे.
दै. ‘पुढारी’ आयोजित राईज अपच्या केवळ महिलांसाठीच्या अॅथलेटिक्स स्पर्धेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलींचा प्रथमच सहभाग पाहायला मिळाला आहे. दै. ‘पुढारी’च्या वतीने उत्तम नियोजन करत असतानाच मोफत प्रवेश ठेवला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक गटातील पहिल्या सात क्रमांकांच्या विजेत्यांना रोख पारितोषिकेही ठेवली आहेत, ही मोठी बाब आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरविण्यात आलेल्या या स्पर्धेत खेळाडूंचा उत्साह द्विगुणित झाला असून, खेळाडूंसाठी दै. ‘पुढारी’चे विशेष आभार मानले पाहिजेत.
- बाप्टिस्ट डिसूझा (ज्येष्ठ राष्ट्रीय अॅथलेटिक्स प्रशिक्षक)
दै. ‘पुढारी’च्या वतीने आयोजित या अॅथलेटिक्स स्पर्धेत कोणतेही शुल्क न आकारता एवढ्या मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात आलेले आहे, ही विशेष बाब आहे. योग्य नियोजन आणि खेळाडूंचा मोठ्या प्रमाणावरील सहभाग, हेच या स्पर्धेचे यश आहे. दै. ‘पुढारी’च्या वतीने या स्पर्धेत मुलींसह पालकांचा मोठा प्रतिसाद असून, अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन भविष्यातही होणे आवश्यक आहे.
- महादेव कसगावडे (जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे)