सासवड: बुधवारी (दि. 16) रात्री पुरंदर परिसरामध्ये चार ते पाच ड्रोन आकाशात उडत असताना लोकांनी बघितले. परिसरामध्ये ड्रोनच्या घिरट्या सुरू झाल्यानंतर विमानतळविरोधी आंदोलनातील आंदोलक शेतकरी वामन मेमाणे (रा. पारगाव मेमाणे) यांनी याबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली.
सरकारचा रात्रीचा ड्रोन सर्व्हे सुरू आहे, असे ते लोकांना सांगत होते. आपली जमीन सरकार काढून घेणार या भीतीपोटी सकाळपर्यंत ते नैराश्येमध्ये गेले आणि याच मानसिक ताणातून गुरुवारी (दि. 17) सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
‘मला माझी जमीन सरकारला द्यायची नाही, मला विमानतळ नको’ असं म्हणतच त्यांनी आपला प्राण सोडला. यानंतर पारगाव ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुरंदर तालुक्यामध्ये सरकारच्या वतीने आंतरराष्ट्रीय विमानतळ मंजूर करण्यात आले आहे. मागील आठ वर्षांपासून या विमानतळाची प्रक्रिया सुरू आहे.
मागील पाच वर्षात हे विमानतळ दुसर्या जागेवर नेण्यात येणार असे सांगण्यात येत होते. मात्र मागील चार महिन्यापासून या विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला आहे. पूर्वीच्या म्हणजे पारगाव, खानवडी, एकतपूर, मुंजवडी, वनपुरी, खानवडी, कुंभारवळण या गावांमध्ये हे विमानतळ होणार आहे. या विमानतळाला जवळपास सात हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. या भागातून अनेक कुटुंबे विस्थापित होणार आहेत. त्यामुळे या भागातील लोकांकडून विमानतळाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.
शासनाच्या ड्रोन सर्वेला लोकांचा विरोध आहे, त्यामुळे पुरंदर येथील प्रशासकीय इमारतीसमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते. पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी तुमच्या भावना आणि तुमचे म्हणणे सरकारपर्यंत पोहोचवले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले होते. त्याच बरोबर ड्रोन सर्व्हेदेखील लांबला होता.
बुधवारी रात्री चार- पाच ड्रोन या गावांमधून फिरत होते. हे काही तरुणांनी पाहिले आणि संपूर्ण गावाच्या लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. लोकांना धास्ती बसली. ड्रोन सर्वेची माहिती वामन मेमाणे यांना मिळाली आणि यातून त्यांच्या मनामध्ये चिंता निर्माण झाली. ते रात्रभर चिंतेत होते. त्यांचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. विमानतळाने घेतलेला हा आमचा या वर्षीचा पहिला बळी आहे, असे विमानतळ प्रकल्पविरोधी आंदोलनाचे प्रमुख पी. एस. मेमाणे यांनी सांगितले.
शासनाकडून अद्याप असा कोणत्याही प्रकारचा सर्व्हे सुरू नाही. आम्हाला कोणत्याही सूचना करण्यात आलेल्या नाहीत.
- स्मिता गौड, उपअधीक्षक भूमी अभिलेख, सासवड
ड्रोन सर्व्हेबाबत सरकारकडून अद्याप कोणताही आदेश आलेला नाही. सर्व्हेअगोदर शेतकर्यांना नोटीस दिल्या जातील. या घटनेशी शासकीय ड्रोन सर्व्हेचा काहीही संबंध नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला ड्रोन फिरला तर तो सकाळी फिरणार आहे. कारण कोणत्या शेतात काय आहे हे दिसणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी सर्व्हे शक्य नाही.
- वर्षा लांडगे, उपविभागीय अधिकारी, पुरंदर