

पुणे: राज्याच्या नोंदणी मुद्रांक विभागाने अतिरिक्त 972 पद निर्मितीचा आकृतीबंधाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्यामुळे राज्यात सद्य:स्थितीतील 3094 पदांमध्ये वाढ होऊन पदसंख्या चार हजारांपर्यंत पोहचणार आहे. राज्यात दरवर्षी सुमारे 25 ते 30 लाख इतके दस्त नोंदविले जातात. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी सध्याच्या पदांचा आढावा घेत कोणती पदे रद्द करता येईल आणि कोणती पदे नव्याने निर्मिती करता येईल याचा आकृतीबंधाचा आराखडा तयार केला आहे.
आकृतीबंधाचा प्रस्ताव मान्यतेसाठी सरकारकडे पाठविला आहे. सध्या 3094 इतकी पदे कार्यरत आहेत. त्यामध्ये नोंदणी महानिरीक्षक उपमहानिरीक्षकांपासून ते मुद्रांक जिल्हाधिकारी, सहजिल्हा निबंधक वर्ग दोनपर्यंतच्या अनेक पदांचा समावेश आहे. मात्र, 71 पदे निरसित करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे 972 ही अतिरिक्त पदे नव्याने निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण पदसंख्या ही तीन हजार 995 इतकी झाली आहे.
नोंदणी उपमहानिरीक्षकांची अंमलबजावणी, तपासणी आणि धोरण संशोधन ही तीन अतिरिक्त पदे तयार करण्यात आली आहेत. सध्याचे मुद्रांक अधीक्षक (मुख्यालय) हे पद आता बदलून अतिरिक्त नोंदणी महानिरीक्षक असे प्रस्तावित आहे. राज्यात सध्या 54 सहजिल्हा निबंधक वर्ग एकची पदे असून, त्यात आता आणखी 12 पदे वाढविण्यात आली आहेत. तसेच सहजिल्हा निबंधक वर्ग दोन किंवा सहदुय्यम निबंधक वर्ग दोन किंवा प्रशासकीय अधिकार्यांची एकूण 260 पदे आहेत. त्यात नव्याने 83 पदांची वाढ करण्यात आली आहे.
नगररचनाकार, सहायक नगररचनाकार, दुय्यम निबंधक श्रेणी 1 किंवा मुद्रांक निरीक्षक पदांमध्ये वाढ केली आहे. दुय्यम निबंधक किंवा मुद्रांक निरीक्षकांची सध्या 394 पदे असून, त्यात नव्याने 81 पदे वाढविण्याचा प्रस्ताव दिला आहे. वरिष्ठ लिपिकांची 393 पदांमध्ये 107 पदे तसेच कनिष्ट लिपिक किंवा मुद्रांक विक्रेत्याच्या 924 पदांमध्ये 524 पदांची वाढ प्रस्तावित केली आहे.
नोंदणी मुद्रांक विभागातील 972 पदांचा आकृतीबंधाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यानुसार काही वरिष्ठ पदे पदोन्नतीने तर कारकून, दुय्यम निबंधकांची पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार आहेत. तसेच शिपायांची पदे ही नोंदणी मुद्रांक विभागामार्फत भरण्यात येणार आहेत.
-रवींद्र बिनवडे, नोंदणी महानिरीक्षक.