नानगाव: यंदाच्या वर्षीच्या मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्यामुळे दौंड तालुक्यातील बागायती भागातील उसाच्या लागवण लांबणीवर जाणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
जून महिन्यात दौंड तालुक्यातील बागायती आणि काही जिरायती भागात मोठ्या प्रमाणावर उसाच्या लागवण होत असतात. यंदा मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर पावसाने जोरदार हजेरी लावली आणि सगळीकडे पाणीपाणी झाले. (Latest Pune News)
त्यामुळे पुढील शेतातील कामे रखडली. त्यानंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतली. त्या काळात शेतकर्यांनी ऊस लागवडीसाठी मशागती करत काही प्रमाणात उसाच्या लागणी केल्या. मात्र, नंतर लगेचच मान्सूनच्या पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतात पाणी साठले आणि या वेळी देखील काही प्रमाणात उसाच्या लागणी वाया गेल्या. तर पाणथळ जमिनींमधील उसाच्या लागणीही खराब झाल्या.
शेतकर्यांचे पावसामुळे मोठे नुकसान
यंदाच्या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने शेतीकामात अडथळा येत आहे. अगोदर केलेल्या उसाच्या लागणी वाया गेल्याने शेतकर्यांचे शेती मशागत, उसाचे बियाणे, औषधे, मजूर, वाहतूक व इतर खर्च देखील वाया गेला आहे. बागायती भागातील काळ्या मातीमुळे शेतीला वाफसा येत नाही. परिणामी, शेतीकामे खोळंबली आहेत.
...तर उसाला चांगला दर मिळेल
उसाच्या लागणी पुढे गेल्यास ऊस लावडीचे क्षेत्र कमी होणार असून, उत्पन्नात देखील घट होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. उसाचे क्षेत्र कमी झाले, तर भविष्यात उसाला चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. दौंड तालुक्यात साखर कारखान्यांबरोबर गुर्हाळ व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे उसाचे क्षेत्र कमी झाले, तर उसाला मोठी मागणी येणार असल्याचे देखील शेतकरी बोलताना दिसून येते आहे.
आठव्या महिन्यात ऊस लागवड होणार?
सध्या मान्सूनच्या पावसामुळे शेतीकामे ठप्प आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी जून महिन्यात उसाच्या लागणी होण्याची शक्यता कमी आहे. जून महिन्यात पाऊस पडत राहिला तर जुलै महिन्यात काही प्रमाणात शेतातील कामे सुरू होतील आणि ऊस लागवडीसाठी शेती तयार केली जाईल. त्यामुळे यंदाच्या वर्षी आठव्या महिन्यात उसाच्या लागणी होतील, असा अंदाज शेतकरी वर्गातून वर्तविण्यात येत आहे.